अकस्मात एखादी अनपेक्षित दुर्घटना घडली तर तिचे परिणाम काय होतात आणि इतरांची कशी तारांबळ उडते हे दर्शविणारी ही घटना आहे. उत्तर प्रदेशातील जांजगिर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयात एका महिलेच्या बाळंतपणाची तयारी चाललेली होती. काही वेळातच तिची प्रसूती होणार होती. तेव्हढ्यात एक महत्वाचे वृत्त सर्वांना समजले. त्यानंतर रुग्णालयात अक्षरश: भूकंप झाला. कारण प्रसूतीची तयारी करत असलेल्या डॉक्टरचाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. हे डॉक्टर भूलतज्ञ होते. प्रसूत होणार असलेल्या महिलेचे सिझेरियन करावे लागेल अशी शक्यता निर्माण झाल्याने या भूलतज्ञांना बोलाविण्यात आले होते.

शोभाराम बंजारे असे या भूलतज्ञांचे नाव होते. त्यांच्याच मृत्यूचे वृत्त थडकताच रुग्णालयातील सर्व उपस्थितांच्या पोटात गोळा आला. डॉ. बंजारे या महिलेला भूल देण्याची तयारी करुन रुग्णालयात आलेले होते. मात्र, ते प्रसूतीकक्षात प्रवेश करुन या महिलेला भुलीचे इन्जेक्शन देणार, तेव्हढ्यात त्यांनाच मृत्यूने गाठले होते. प्रसूतीच्या कक्षात इतर डॉक्टर्स आणि नर्सेस तयार होत्या. भूलतज्ञ प्रसूतीगृहात येताच कोसळले होते. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. प्रसूत होणाऱ्या महिलेच्या आधी डॉक्टरांवरच उपचार करण्याची वेळ आली. तथापि, उपचार होत असतानाच डॉक्टरांचा मृत्यू झाला. आता प्रसूती कशी होणार याची चिंता साऱ्यांना वाटू लागली. कारण या महिलेची प्रकृतीही नाजूकच होती.
भुलीचे इन्जेक्शन तज्ञ डॉक्टरांनाच द्यावे लागते. इतर कोणी ते देऊ शकत नाही. कारण भुलीच्या औषधाचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास रुग्णासाठी ते धोकादायक असते. ऐनवळी दुसरा भूलतज्ञ उपलब्ध होणेही कठीण होते. पण, अखेरीस या महिलेची प्रसूती नैसर्गिकरित्या झाली. तिचे सिझेरियन करण्याची आवश्यकता निर्माण झाली नाही. त्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना आता त्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. ही महिला आणि तिचे अर्भक यांच्या आयुष्याची दोरी घट्ट होती, म्हणून दोघेही वाचले आहेत.









