या दुर्दैवाला म्हणावे तरी काय ?
आपल्याला पुत्र असावा, तो सुदृढ, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असावा, असे प्रत्येक महिलेला वाटणे स्वाभविकच आहे. पुत्र असो किंवा कन्या असो, त्यांच्या हितासाठी आपला जीव ओवाळून टाकण्यास माता सज्ज असते. अपत्यांना जन्म देणे हे सहज आणि सोपे कार्य नाही. पण असह्या अशा मातृवेणा माता अपत्यांसाठी सहन करते. तरीही काही मातांना दुर्दैवाशी दोन हात करावे लागतात.
अशीच एक दुर्दैवी माता आहे केनिया देशाची नागरीक अग्नेस नेस्पाँडी. ती मुलांच्या संख्येच्या संदर्भात मुळीच दुर्दैवीं नाही. चांगले 11 पुत्र तिला आहेत. पण महादुर्दैव असे की हे सर्व पुत्र जन्मांध आहेत. त्याहीपेक्षा मोठे दुर्दैव असे की, पुत्रांच्या या शारिरीक व्यंगासाठी तिला उत्तरदायी मानण्यात येत आहे. ती ज्या समाजात राहते, तो शिक्षण आणि आधुनिक विचार यांपासून दूर आहे. त्यामुळे तिच्या अवतीभोवतीचा समाज दिला सहानुभूती देण्याऐवजी तिलाच ‘शापित माता’ मानतो. तिच्याशी फटकून वागतो. त्यामुळे तिला अधिकच मानसिक यातना होतात.
तिच्या दुर्दैवाचे दशावतार येथेच संपत नाहीत. तिच्या पतीचे 21 वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून या 11 अंध मुलांचे तिलाच पहावे लागते. ती थोडीफार शिकलेली आहे. अंधत्वासारखे व्यंग असलेल्या 11 मुलांचे संगोपन करणे तिला कठीण जात आहे. तिचे उत्पन्नही फारसे नाही. समाज, सामाजिक संस्था किंवा सरकार तिला विशेष साहाय्य करीत नाहीत. तिने नुकत्याच तिच्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या आहेत. कोणाच्याही अंत:करणाला चरे पडतील अशीची तिची दुर्दैवी कहाणी आहे. अनेकजण तिचा उल्लेख जगातील सर्वात दुर्दैवी माता असा करतात. तिला ते आवडत नाही. काकिसी नामक चेटकिणीने तिच्यावर काळी जादू केली आहे, असेही काहीजण मानतात. तिला पहिला पुत्र झाला तेव्हा ती खूपच आनंदित झाली होती. पण तो अंध आहे हे समजल्यानंतर तिच्या आनंदावर विरजण पडले. तरीही तिने दुसऱ्या पुत्राला जन्म दिला. पण तोही अंध होता. एकतरी अव्यंग पुत्र जन्माला येईल, या आशेपोटी तिने 11 पुत्रांना जन्म दिला. पण प्रत्येकवेळेस तेच दुर्दैव आड आले. अर्थात, या बाबीं कोणाच्या हाती थोड्याच असतात ?









