परवा भारताने दिमाखदार विजय मिळवला. सर्वत्र दसऱ्याअगोदर दिवाळी साजरी झाली. अर्थात प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाचीच गोष्ट होती. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील पहिला पगार, त्याचा लग्न सोहळा याचा अप्रूप असतं, आता त्यात भर पडली आहे ती विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या विजयाची. मला आठवतो ते दिवार चित्रपटातील शशी कपूरचा तो डायलॉग. (मेरे पास माँ है) हाच डायलॉग प्रत्येक भारतीय खेळाडू वेगळ्या शब्दात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला ऐकवत आला आहे. तुमच्याकडे सर्व काही असेल पण आमच्याकडे विश्वचषकातला तुमच्या विरुद्धचा विजय आमच्याकडे आहे. राजकारणात सर्वसाधारणपणे काय बोलण्यापेक्षा काय बोलू नये, ही गोष्ट जेवढी महत्त्वाची असते तेवढीच क्रिकेटमध्ये प्रसार माध्यमांसमोर आपण नेमकं काय म्हटलं पाहिजे याचं भान प्रत्येक खेळाडूला असणे गरजेचे आहे. सामना सुरू होण्याअगोदर शाहीन आफ्रिदी असाच बरळला होता. निम्मा संघ मी गारद करेन असा तो म्हणाला होता. शेवटी तो तोंडावर आपटलाच. असो
1940 ते 1960 च्या दशकात सर डॉन जॉर्ज ब्रॅडमन यांची क्रिकेटवर मक्तेदारी होती. 1948 ला ज्यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला गेला होता तेव्हा एका कसोटी सामन्यात ब्रॅडमन यांनी विनू मांकडवर चौफेर हल्ला चढवला होता. अर्थात त्यावेळी विनू मांकड यांना अशा ट्रीटमेंटची सवय नव्हती. त्यावेळी कांगारूचा नॉन स्ट्रायकर किथ मिलर म्हणाला होता तू एवढा निराश होऊ नकोस, ते तुलाच धोपटतो असे नाही तर कुणालाही अशी ट्रीटमेंट देतो. हा किस्सा अशासाठी आठवला की रोहित शर्माने काल कुणालाच दयामाया दाखवली नाही. गोलंदाजाच्या कबरी कशा खोदायच्या हे रोहितला चांगलेच माहित आहे
तरीसुद्धा एक प्रश्न मला आनंदोत्सव साजरा करून सुद्धा राहून राहून पडत होता तो म्हणजे तीन बाद 155 वरून सर्वबाद 191. अशा घटना पाकिस्तानच्या विश्वचषकातच का होतात? खरं म्हणजे सव्वा लाख प्रेक्षकांचा दबाव भारतावर होता घडलं मात्र याउलट. अर्थात माझ्या मते याचं खरं कारण सांगायचं झालं पाकिस्तान मधल्या क्रिकेटच्या फॅनचे. पाकिस्तानमधल्या खेळाडू वर वाढणारा दबाव. खेळपट्टी गोलंदाजाला पोषक होती का? तर मुळीच नाही. जी खेळपट्टी पहिल्याच सामन्यात होती तीच खेळपट्टी भारत-पाक सामन्यासाठी होती. तीन बाद 155 पर्यंत सर्व काही आलबेल होतं. अचानक बाबर, रिजवान यांना कुठल्या चेंडूवर कुठले फटके खेळले पाहिजे याचा विसर पडला. जसा विसर महाभारतात कर्णला रणभूमीत पडला होता अगदी तसा. आता एकंदरीत ज्या पद्धतीने पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरुद्ध जो खेळ केला त्यावरून तरी आता मला असं वाटू लागले की आता तरी पाकिस्तानने एका चांगल्या मानसोपाचार तज्ञाची मदत घ्यावी. कालच्या सामन्यात जो अॅग्रीव्हसिव्हपणा दिसायला पाहिजे होता, तो दिसला नाही. किंबहुना त्यांची देहबोली पडलेली दिसली होती. क्षणभर हाच काय तो पाकिस्तानचा संघ जो भारताविरुद्ध आक्रमकतेने खेळायचा हा प्रश्न माझ्यासमोर पडला होता. असो परंतु पराभवसुद्धा ताठ मानेने स्वीकारता आला पाहिजे. या पराभवातून पाकिस्तानने बरच काही शिकलं पाहिजे. त्यातच पाकिस्तानचे क्रिकेट डायरेक्टर आर्थर यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणतात वर्ल्डकपपेक्षा ही बीसीसीआयची स्पर्धा जास्त वाटू लागली आहे. कहानी मे तो ट्विस्ट आया है. बघूया ही स्पर्धा कुठल्या वळणावर आपला रंग बदलते.









