सुट्टीत करण्याच्या अनेक उद्योगांपैकी बऱयाच विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आवडता उद्योग म्हणजे चित्रपट बघणे. पूर्वीपासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत अनेक शिक्षक-पालक चित्रपटाकडे मनोरंजनाचे साधन म्हणूनच बघतात. त्यामुळे ‘चित्रपट म्हणजे दोन घटका करमणूक’ असे संस्कार आपल्यावर लहानपणापासून केले जातात. तो गैरसमज पक्का ठसवला गेल्यामुळे आपली सुरुवात कोणताही चित्रपट बघण्यापासून होते. चित्रपटाची निवड चोखंदळपणे करण्यात त्यामुळे आपल्याला उशीर झालेला असतो. चित्रपट खरे तर दिग्दर्शकाचा असतो व आपल्याकडे नायक-नायिका यांच्या नावाने चित्रपट ओळखला जातो. त्यामुळे चित्रपट कोणता बघायचा याचे आडाखे चुकत जातात. म्हणून चित्रपटाची निवड करताना दिग्दर्शक कोण आहे हे बघावे, चित्रपट बघण्यापूर्वी त्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
दंगल चित्रपट बघण्यापूर्वी फोगट भगिनींच्याबद्दल माहिती घ्यावी, गीता-बबिता यांचे वडील महावीर सिंग फोगट यांनी आपल्या मुलींना कुस्ती शिकवण्यासाठी काय केले, याबद्दल माहिती मिळवावी. त्यानंतर ‘बापू सेहत के लिये हानिकारक है’ हे गाणे कोणी लिहिले, संगीत दिग्दर्शक कोण, राजस्थानमधील दुर्गम भागातील सरवर आणि सरताज यांनी ते गाणे मुंबईतल्या स्टुडियोमध्ये कसे गायले, हे वाचावे. त्यानंतर आमिर खानने या चित्रपटासाठी आधी वजन वाढवून ते शूटिंग आधी केले आणि नंतर फिट असलेल्या नायकाचे प्रसंग कसे चित्रित केले, त्याबद्दल वाचन करावे, व्हिडियो बघावे. इंटरनेटमुळे हे सहज साध्य आहे. यानंतर चित्रपट बघताना ते प्रसंग कसे लिहिले असतील, चित्रित केले असतील याची कल्पना येते.
चित्रपट कधीच डोके बाजूला ठेवून बघायचा नसतो. चित्रपट ही अनेक कलांसारखीच कला आहे. या कलेचे वैशिष्टय़ म्हणजे ती मानव निर्मित कला आहे. माणसाने तंत्रज्ञानाचा शोध लावला आणि त्यामधून छायाचित्र (खरे तर प्रकाशचित्र) काढणे, चित्रपट तयार करणे अशा कलांचा जन्म झाला. एखादे चित्र बारकाव्यासह वाचणे हे कौशल्य प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतेच असे नाही. ते कौशल्य कमवावे लागते. चित्रकलेचे शिक्षक कदाचित ती दृष्टी देऊ शकतात. परंतु चित्रपट कसा बघायचा आणि का बघायचा याबद्दल शालेय जीवनात कोणी सांगत नाही. खरे तर दर्जेदार चित्रपट बघितल्यानंतर एखाद्या अवघड विषयामध्ये आवड निर्माण होऊ शकते. ‘बँड बाजा बारात’ चित्रपट प्रेमकथा नाही तर उत्तम बिझिनेस कसा करावा याबद्दल ती एक सुरस कथा आहे. ‘लगान’ चित्रपट उत्तम टीमवर्क कसे असावे याबद्दल आहे. त्यामुळे कोणता चित्रपट कसा बघावा हे समजून घ्यावे.
पुस्तक वाचनाला वैविध्यपूर्ण चित्रपट बघण्याची जोड दिली तर वाचक-प्रेक्षक समृद्ध होतो. यात महत्वाचे हेच की आपण काय बघतो! समोर जे दिसेल ते आपण बघत बसलो तर टीव्हीवरच्या कौटुंबिक सिरीयल आवडतात. त्या सिरियलमध्ये आवडण्यासारखे काहीच नसते परंतु आपण आपल्या हातातला रिमोट वापरताना डोके चालवत नाही आणि लख्ख प्रकाशात होणारी सासवा-सुनांची भांडणे आपण मिटक्या मारत बघतो. पूर्वी टीव्हीवर एकच चॅनेल असायचा पण आता अनेक चॅनेल, वेबवरील अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण रिमोट कसा वापरतो यावर आपण टीव्हीचा वापर करतो की दुरुपयोग, हे ठरते. कौटुंबिक मालिका बघणाऱया पालकांच्या मुलांना टीव्हीवर चांगले काय बघावे हे समजत नाही. पालकांनाच उत्तम बघण्याची सवय असेल तर मुले त्याचे अनुकरण करतात. रोज एक कौटुंबिक मालिका एक तास बघण्यापेक्षा आठवडय़ात दोन उत्तम चित्रपट बघणे केव्हाही श्रेयस्कर.
इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी इंग्रजी चित्रपट हे उत्तम माध्यम आहे. कोणतीही भाषा आत्मसात करण्यासाठी ती ऐकण्याची सवय असायला हवी. शालेय जीवनात वैविध्यपूर्ण इंग्रजी कानावर पडत नाही. त्यामुळे शाब्दिक कोटय़ा समजत नाहीत. ‘बेबीज डे आउट’ चित्रपट बघताना त्यातल्या स्लॅपस्टिक विनोदावर आपण हसतो पण त्या चित्रपटात शाब्दिक कोटय़ा अनेक वाक्यामध्ये आहेत. त्या समजण्यासाठी तोच चित्रपट संवाद ऐकण्यासाठी पुन्हा बघावा. सबटायटल्स वाचता वाचता चित्रपट बघण्याची सवय करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. काही चित्रपट अशाप्रकारे बघितल्यानंतर सबटायटल्स वाचण्याची गरज भासत नाही. ब्रिटिश/अमेरिकन इंग्रजी वेगवेगळ्या चित्रपटातून ऐकल्यामुळे आपली शब्दसंपदा वाढते. ‘कुंग फु पांडा’ हा चित्रपट इंग्रजीमध्येच सबटायटल्स वाचता वाचता बघावा. ‘Akeelah & the Bee’ हा चित्रपट स्पेलिंग सहजगत्या कसे लक्षात ठेवावे याचे तंत्र समजण्यासाठी महत्वाचा आहे. खरे तर हे चित्रपट फक्त लहान मुलांचे नाहीत, शिक्षक-पालकांनी सहकुटुंब बघावेत, असेच आहेत. ‘कुंग फु पांडा’ चित्रपट ऍनिमेशन असल्यामुळे लहान मुलांचा आहे असा एक गैरसमज आहे. हा चित्रपट पालक-शिक्षकांसह सर्वांनी संवाद समजून बघण्यासारखा आहे. इंग्रजी भाषेमधील लहेजाचे वैविध्य समजण्यासाठी एक ब्रिटिश इंग्रजी (Kings Speech), एक अमेरिकन इंग्रजी (Baby’s Day out), एक अफ्रो-अमेरिकन (The boy who harnessed the wind) उच्चारांचा चित्रपट बघणे श्रेयस्कर ठरेल. कोणतीही कला किंवा खेळ कसा शिकावा हे समजून बघण्यासाठी हॅराल्ड ज्वार्ट दिग्दर्शित ‘द कराटे कीड’ हा असाच आवर्जून बघावा असा चित्रपट. या चित्रपटामध्ये गुरू शिष्याला जाकीट कसे टांगून ठेवावे हे शिकवतो. त्याचा कराटे शिकण्याशी काय संबंध आहे, असा प्रश्न साहजिकपणे त्या शिष्याला पडतो आणि थोडय़ा वेळानंतर त्याचे उत्तर शिष्याला आणि आपल्याला समजते.
पहिले अथवा दुसरे महायुद्ध इतिहासाच्या पुस्तकात बघून समजत नाही. त्याचे दृश्य स्वरूप डोळ्य़ासमोर आल्यानंतरच महायुद्धातले बारकावे समजतात आणि त्याविषयाबद्दल उत्सुकता वाढते. जर्मनीचे सैन्य मजल दरमजल करता करता रशियाच्या नदीजवळ येऊन ठेपले. त्यावेळेपर्यंत जर्मनी जिंकणार असेच वाटत होते परंतु बदलत्या हवामानाने रशियाला मदत केली. हे सर्व पुस्तकात वाचल्यानंतर Enemy at the gates सारखे चित्रपट बघावे. युद्धात एखादा सैनिक शत्रूच्या हद्दीत गेल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी काही करणे किती जिकिरीचे असते les Behind the enemy lines चित्रपट बघितल्यावर उमजते. इतिहास कोणाच्याही बाजूने बघण्या-वाचण्यापेक्षा अनेक दृष्टिकोनातून तटस्थपणे अनुभवावा. त्यासाठी रिचर्ड अटनबोरॉ दिग्दर्शित ‘गांधी’ चित्रपट बघणे आवश्यक आहे. राजा बोलताना अडखळत होता हे सत्य ब्रिटिशांनी स्वीकारले आणि त्यावर कोणते उपाय केले गेले यावर The Kings Speech चित्रपट काढला. तो बघितल्यावर आपल्या लक्षात येते की असा चित्रपट भारतात होऊ शकत नाही. 27 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झालेले नेल्सन मंडेला यांनी काळे-गोरे मनभेद नष्ट करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण स्वीकारण्यासाठी काय केले हे समजण्यासाठी Invictus बघावा. ‘भारत एक खोज’ ही दूरदर्शन मालिका त्याकाळचे वातावरण समजून घेण्यासाठी बघावी. अन्यथा ‘तानाजी’ सारख्या चित्रपटात प्रत्येकाचे भव्य महाल दाखवण्यात आले आहेत आणि एक राजा नायक आणि दुसरा राजा खलनायक दाखवला आहे, ज्यामुळे इतिहासाबद्दल चुकीच्या कल्पना तयार होतात.
कोणत्याही देशाची भौगोलिक परिस्थिती दृश्य माध्यमातून चांगली समजू शकते. दक्षिण आफ्रिकेचा इतिहास आणि भूगोल समजून घेण्यासाठी Amistad, 12 years a slave असे चित्रपट बघावेत. The Imitation Game सारख्या चित्रपटामधून शास्त्रज्ञांनी शोध कसे लावले हे अनुभवता येते. जॉन नॅश या गणितज्ञाच्या शोधक वृत्तीवर The Beautiful mind, रामानुजनच्या आयुष्यावर आधारित Infinity आपल्यातल्या अभ्यासकाला जागे करतात. पक्षी घरटे कसे बांधतात, वेली-झाडे यांचे परागीकरण (pollination) कसे होते, जंगलातील प्राणी दुसऱया प्राण्याची बलस्थाने कशी जाणून असतात हे सर्व डेव्हिड अटनबोरॉ यांनी BBC च्या अनेक डॉक्युमेंटरीमधून समजावून सांगितले आहे. विषय कोणताही निवडा, त्यावर अभ्यासपूर्ण आणि तितकेच उत्कंठावर्धक चित्रपट, माहितीपट अनेक आहेत.
एकूण काय, सुट्टीमध्ये प्रत्येक आठवडय़ाला एक चित्रपट बघायचा असल्यास विद्यार्थ्यानी जरूर बघावा पण प्रत्येकवेळी भाषा वेगळी असावी, चित्रपटाचा प्रकार वेगळा असावा, चित्रपटात दाखवलेला देश/प्रदेश वेगळा असावा, विषय वेगवेगळा असावा.
बिझिनेस कसा करावा
रोज आपण काय केले, कसा वेळ घालवला याची वहीत नोंद करावी आणि जेवढा वेळ पुस्तक वाचनामध्ये घालवला आहे, तेवढा वेळ चित्रपट बघायला हरकत नाही, मात्र टीव्ही सिरीयल बघण्यात वेळ फुकट घालवू नका.
– सुहास किर्लोस्कर








