पुणे / प्रतिनिधी :
लोकप्रतिनिधी आजारी असतानाही त्यांना मतदानासाठी वा प्रचारासाठी आणणे, हे माणुसकीला धरून नाही. खासदार गिरीश बापटसाहेबांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी बाहेर पडू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असतानादेखील ते प्रचारासाठी आले. यातून भाजपाची प्रवृत्ती दिसून येत असून, भाजपाला माणुसकीचे विस्मरण झाल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी येथे केली.
कसब्यात प्रचार रॅलीसाठी आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. प्रचार रॅलीत काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री विश्वजीत कदम, काँग्रेस पक्षाचे लातूरचे आमदार धीरज देशमुख, युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई हे सहभागी झाले होते. पवार म्हणाले, भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक अखेरपर्यंत पक्षासोबत राहिल्या. त्या आजारी असतानादेखील त्यांनी दोन वेळा विधिमंडळात येऊन मतदान केले. त्याचदरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर आता पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संधी देतील, असे वाटत होते. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील नागरिक मोठय़ा प्रमाणावर नाराज असून, येथील नागरिक भाजपाला त्यांची निश्चित जागा दाखवतील.
भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांनी अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. बापट साहेबांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला होता. मात्र, पक्षातील नेत्यांच्या भेटीनंतर ते प्रचारासाठी मैदानात उतरले. यातून भाजपाची प्रवृत्ती दिसून येत असून, भाजपला माणुसकीचे विस्मरण झाले आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे गल्ली ते दिल्लीपर्यंतचे नेते मतदारसंघात आल्याने त्यांची परिस्थिती काय झाली आहे, ते दिसते आहे. या निवडणुकीत एक नंबरवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर राहतील आणि विजयीदेखील होतील. तर दोन नंबरवर आनंद दवे राहतील, असा दावाही त्यांनी केला.








