संतोष पाटील,कोल्हापूर
पावसाळा आला की पंचगंगा नदीला पूर येतोच.महापुराच्या रडारवर जिह्यातील 345 गावे आणि शहरातील 81 पैकी 33 प्रभाग आहेत.वर्षभरात या गावांना महापुरापासून वाचवण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाययोजना सरकारी पातळीवर झाल्या नाहीत.महापुराच्या अनाहूत धास्तीने अगोदरच घरे रिकामी करणे हेच आपत्ती व्यवस्थापन काय? पंचगंगा 40 फुटांवर असताना अर्धे शहर रिकामे करावे लागणे हेच प्रशासनाचे यश काय? मोठी धरणं भरली नाहीत.कृष्णेच्या पाण्याला फुग नाही.अलमट्टी धरणातून तिप्पट विसर्ग आहे, तरी कोल्हापुरात उद्भवणारी पूरस्थिती म्हणजे महापूर म्हणायचे की पाण्याचा निचरा खोळंबा हे ठरवण्याची वेळ आता आली आहे.
मुसळधार पाऊस आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडून पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते या ‘जर-तर’च्या निकषावर जिल्हा प्रशासनाने 2019 आणि 2021 च्या महापुरात 52 फुटांपर्यंत पंचगंगा गेल्यावर पाणी आलेली सर्व ठिकाणी रिकामी करण्याचे नियोजन केले.महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सजग असल्याचे यातून दिसले. 2019 च्या महापुरात 350 दुभती जनावरे तसेच प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले.मात्र, 2021 च्या महापुरात दोन फुटांनी म्हणजे सरासरी 55-56 फुट पाणी पातळी जादा असूनही प्रापंचिक तसेच जीवित नुकसान टळले. याचा अर्थ कोल्हापूरकर महापुराबाबत अधिक काळजी घेत आहेत.पंचगंगेची पाणी पातळी वाढू शकते, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी जा, या प्रशासनाच्या आवाहनाने तारंबळ उडाली. कोल्हापुरात महापुराची अनेकांनी धास्ती घेतली.
दोन महापुरात महाप्रचंड पाऊस हे एक प्रमुख कारण होते.यंदा मुसळधार पाऊस झालेला नाही.पंचगंगा गेल्या 30 तासांपासून 40 फुटांवर स्थिर राहिली. कळंबा तलाव अद्याप भरलेला नाही,त्यामुळे कळंबातलावातून जयंती नाल्यातून होणारा विसर्ग नाही,कृष्णा नदीच्या पाण्याला फुग नाही.कोयना नदीतून विसर्ग नाही. राधानगरी धरण खूप उशिराने भरले. अलमट्टी धरणातून सुरवातीला आठ हजार तर नंतर 30 हजार क्युसेक विसर्ग असूनही पंचगंगा का थबकली,याचा शास्त्रीय अर्थाने विचार करुन त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. ठेकेदार जगवण्यासाठी नदीतील गाळ काढणे हाच एककलमी कार्यक्रम हाती घेणे चुकीचे ठरणार आहे. नदीकाठावरील भराव काढण्यासह पूरप्रवण क्षेत्रातील इमारतींचा जोता लेव्हलमध्ये वाढ,जयंती नाल्यातील गाळ शंभर टक्के काढणे.शहरातील लहान-मोठे 357 नाल्याचा पुन्हा नैसर्गिक प्रवाह कायम करणे आदी मुलभूत उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.
कोल्हापूरची वाटचाल मुंबई-चेन्नईकडे..!
मनुष्यवस्तीच्या (शहर, गाव) वरच्या बाजूला जे नदीचे जलग्रहण क्षेत्र असते तिथे खूप पाऊस पडल्यामुळे नदीचा प्रवाह वाढतो आणि पाणी नदीपात्रातून ओसंडून वस्तीत शिरते. याला पूर म्हणतात. पाऊस दूर कुठेतरी वरच्या बाजूला नाही, तर वस्तीतच पडतो. पण हे पावसाचे पाणी वेळेत नदीपर्यंत पोहोचून त्याचा निचरा होत नाही, त्यामुळे वस्ती जलमय होते, त्याला इंग्रजीत ‘ड्रेनेज कंजेशन‘ म्हणतात.मराठीत आपण त्याला ‘निचरा खोळंबा‘ म्हणतो. पंचगंगा नदीचे पाणी 2019 आणि 2021 ला कोल्हापुरातील नागरी वस्तीत शिरते तो पूर. आणि 2005 मध्ये मुंबईत आणि 2009 ला चेन्नईत जे घडले, तो ‘निचरा खोळंबा’.आता कोल्हापुरात पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने निचरा खोळंबा होत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
धरणशास्त्राची गरज
राधानगरी धरणातून सोडलेलं पाणी येण्यास साधारणत: 12 तास लागतात. याचदरम्यान अलमट्टी धरणातून 8 हजार वरून 30 हजार क्यूसेक विसर्ग केला आहे.बुधवारपासून 42 हजार क्युसेक केला.याचा अर्थ 33 हजार क्यूसेक जादा पाणी सोडले जाणार आहे.राधानगरीच्या एका दरवाज्यातून 1428 क्यूसेक सर्व दरवाजे उघडले तरी त्यातून 9996क्युसेक तसेच पॉवर हाऊसमधून नदीत येणारे 1400 क्युसेक असे मिळून 11396 क्युसेक पाणी पंचगंगेत येईल.तर राजाराम बंध्राऱ्यावरुन 60106 क्युसेक विसर्ग सुरू आहे.वारणा नदीतून 2456 क्युसेक विसर्ग बुधवारी अकरा नंतर सुरू झाला. याचवेळी कोयना नदीतून 1050 क्युसेक विसर्ग सुरू होता.कृष्णा नदीच्या पाण्याला फुग नाही.अलमट्टीतून विसर्ग वाढवला असून पावसाची अशीच स्थिती राहिली तरी येत्या दोन दिवसात पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी होईल,असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.