राहुल गांधी यांचा लोकसभेत प्रश्न, भाजपवर शरसंधान, भाजपचाही जोरदार पलटवार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे नेमके संबंध काय आहेत, असा प्रश्न काँगेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. अदानी यांच्या संपत्तीत झालेली प्रचंड वाढ ही पंतप्रधान मोदींचा त्यांच्यावर वरदहस्त असल्यानेच झाली, असा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला. भाजपनेही त्यांना आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याचे आव्हान देऊन पलटवार केला.
पंतप्रधान मोदी सत्तेवर येण्यापूर्वी श्रीमंत व्यक्तींच्या जागतिक सूचीत गौतम अदानी यांचा क्रमांक 600 च्या पुढचा होता. तथापि, गेल्या 9 वर्षांमध्ये ते अचानक दुसऱया क्रमांकावर आले होते. त्यांना वारेमाप कर्जे भाजपच्या सत्ताकाळात मिळाली आहे. आता ही कर्जे बुडल्याने एलआयसीसह काही बँकांची जबर हानी झाली आहे, या हानीला केंद्र सरकार जबादार आहे, अशा अर्थाचे व्यक्तव्य राहुल गांधींनी लोकसभेत केले. पंतप्रधान मोदी सत्तेवर येण्यापूर्वी अदानी यांचा उद्योग विस्तार मर्यादित होता. तथापि, नंतरच्या काळात तो सात ते आठ क्षेत्रांमध्ये विस्तारला. हा उत्कर्ष कसा झाला असा प्रश्नाही त्यांनी विचारला.
केवळ अदानींचेच नाव
मी तामिळनाडू ते जम्मू-काश्मीर अशी पदयात्रा केली. या संपूर्ण प्रवासात केवळ एकच नाव आमच्या कानावर पडत होते. ते अदानी यांचे होते. पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच अदानी यांना इतके प्राधान्य मिळाले हे उघड आहे, असा आरोप त्यांनी केला. पण हा आरोप त्यांनी प्रत्यक्ष पदयात्रा सुरु असताना क्वचितच केलेला होता. शिवाय पदयात्रा संपेपर्यंत अदानी यांच्या समभागांची घसरणही झालेली नव्हती, या मुद्दय़ांचा खुलासा त्यांनी करावा, असा टोमणा मारण्यात आला.
बेरोजगारी, महागाईवरही टीका
संपूर्ण पदयात्रेत लोकांच्या तोंडी महागाई आणि बेरोजगारी यांचा मुद्दा होता. या सरकारच्या काळात या दोन्ही बाबींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लोकांना संकटात टाकले जात आहे. त्यामुळे लोक या सरकारला कंटाळले आहेत. शेतकऱयांच्या अनेक समस्या असून सरकार त्यांच्यासंबंधी मूग गिळून गप्प आहे. सरकारने तोंड उघडावे, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले.
भाजपचे प्रत्युत्तर
राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करत असून, पदयात्रा करुनही देशात वातावरण कसे आहे हे त्यांना उमगलेले नाही. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचा कोणताही संबंध नाही ही बाब सर्वांना माहिती आहे. राहुल गांधी यांची खात्रीच असेल तर त्यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे लोकांसमोर मांडावेत. केवळ तोंडी आरोप करु नयेत. केंद्र सरकाराने आजवर शेतकऱयांसाठी अनेक लाभदायक योजना आणल्या असून शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना वेगाने मार्गस्थ होत आहे. शेतकऱयांनाही याचे समाधान आहे, असे प्रत्युत्तर कायदामंत्री किरण रिजीजूंनी दिले.
गांधींनी दाखविले छायाचित्र
पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे संबंध सिद्ध करण्यासाठी राहुल गांधी यांनी या दोघांचे एक जुने छायाचित्र लोकसभेत दाखविले. या छायाचित्रावरुन ते एकमेकांच्या किती जवळ आहेत, याची कल्पना येते. यामुळेच अदानींना प्रचंड प्रमाणात गुंतवणूक मिळाली आणि ते धनवान झाले, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधींचा पुन्हा जिव्हाप्रमाद ?
केंद्र सरकार आणि अदानी यांच्यातील संबंध सांगण्याच्या नादात पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडून चूक घडली अशी चर्चा होती. अदानी यांना संरक्षण क्षेत्रातील कोणताही अनुभव नाही. आमच्यावर विनाकारण आरोप केले जातात, असे पंतप्रधान मोदींनी सोमवारी कर्नाटकात हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी स्पष्ट केले. मात्र याच हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे 126 विमानांचे कंत्राट त्यांनी अनिल अंबानी यांना दिले, असा आरोप त्यांनी केला. तथापि, तो करताना त्यांनी अदानी आणि अंबानी या नावांचा गोंधळ केला अशी चर्चा नंतर केली जात होती. यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.









