आपल्याला महागाई आवडत नाही, हे उघड आहे. तथापि, महाग वस्तूंचे आकर्षण मात्र प्रत्येकाला असते. या आकर्षणातून जगातील सर्वात महाग वस्तू कोणती, हा प्रश्न निर्माण होतो. या जगातील आजवरची सर्वात महाग एकल वस्तू कोणती, याचे उत्तर शोधणे कठीण आहे. स्थळ, काळ इत्यादींच्या संदर्भात या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागते. सध्याच्या माहितीनुसार किंवा 2024 च्या अखेरीपर्यंत ‘हिस्टरी सुप्रिम’ नामक एक नौका किंवा यॅच ही या जगातील सर्वात महागडी वस्तू ठरली आहे.
ही नौका शीडाची असून ती लहान अंतराचा जलप्रवास किंवा नौकांच्या शर्यतीसाठी उपयोगात आणली जाते. जगातील या सर्वात महाग एकल वस्तूची किंमत तब्बल 4 अब्ज 50 कोटी डॉलर्स, अर्थात साधारणत: 38 हजार कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. या नौकेची निर्मिती करण्यासाठी तीन वर्षे लागली असून तिची निर्मिती अत्यंत महागडे धातू आणि साधनांपासून करण्यात आली आहे. ही नौका सर्वसामान्य उपयोगासाठी नसून केवळ पैसे खर्च करण्याची ‘हौस’ म्हणूनच विकत घ्यायची वस्तू आहे. या नौकेच्या निर्मितीसाठी प्लेटिनम, सोने असे धातू उपयोगात आणण्यात आले असून ती मौल्यवान रत्नांनी मढविण्यात आली आहे. नौकेचा डेक, रेलिंग्ज, भोजन कक्ष आणि नौकेचा नांगर ही सर्व साधने सुवर्णाने सजविण्यात आलेली आहेत. त्यामुळेच ती पृथ्वीवरची आजवरची सर्वात महाग एकल वस्तू म्हणून प्रसिद्धीस पावली आहे, असे म्हणता येते.









