मडगावातील स्वयंपूर्ण चतुर्थी बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांचा सवाल
प्रतिनिधी/मडगाव
आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाच्या अंतर्गत सरकारने कदंब बसस्थानक, मडगाव येथे 10 दिवसांचा स्वयंपूर्ण चतुर्थी बाजार भरवलेला असताना गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी कोविडची झळ बसलेल्या छोटय़ा पारंपरिक व्यवसायांच्या व्यापाऱयांकडून ‘कोविड रिलिफ’साठी आलेल्या हजारो अर्जांचे भवितव्य काय हे स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. गणेश चतुर्थी जवळ आली असून महागाई आणि बेरोजगारी वाढत असताना कोविड महामारीने ग्रासलेल्या मोटारसायकल पायलट, खाजेकार, चणेकार इत्यादी लोकांना आश्वासन दिल्याप्रमाणे सरकारकडून दिलासा मिळाला आहे का हा प्रश्न पडतो, असे सरदेसाई यावेळी बोलताना म्हणाले.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणात गणेश चतुर्थी असल्याने श्री गणेश शुभवार्ता घेऊन येतील आणि लोकांची सर्व दुःखे दूर करतील, असे सांगितले. चतुर्थी बाजार आयोजित करण्याच्या संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, यामुळे लहान व्यापारी आणि स्वयंसाहाय्य गटांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी केवळ व्यासपीठच मिळत नाही, तर लोकांना एकाच ठिकाणी सारी खरेदी करण्याची संधी मिळते.
सदर चतुर्थी बाजाराचे उद्घाटन फातोर्डाचे आमदार सरदेसाई आणि मडगावचे आमदार कामत यांच्या हस्ते संयुक्तपणे करण्यात आले. यावेळी वरि÷ शासकीय अधिकारी लेविन्सन मार्टिन्स, अजित पंचवाडकर, मडगाव पालिका मुख्याधिकारी रोहित कदम आदी उपस्थित होते. लेविन्सन मार्टिन्स यांनी सांगितले की, सुमारे 40 विपेत्यांना प्रथम येणाऱयास प्राधान्य या तत्त्वावर स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे. लोकांनी या बाजाराला भेट देऊन खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले. पंचवाडकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
मुख्यमंत्र्यांनी दक्षिण गोव्यातील मतदारांना गृहीत धरू नये
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप केवळ दक्षिण गोव्याचा मतदारसंघ पुन्हा मिळवणार नाही, तर अल्पसंख्याकांचे प्राबल्य असलेल्या सासष्टीचा पाठिंबाही पक्षाला मिळेल, असे म्हटले होते. य?ावर प्रसिद्धीमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे ज्ये÷ आमदार दिगंबर कामत यांनी दक्षिण गोव्यातील मतदारांना गृहीत धरू नका, असे म्हटले.
दक्षिण गोव्याच्या जागेसाठी मुख्यमंत्री रिंगणात उतरणार आहेत काय, असा प्रतिसवाल यावेळी सरदेसाई यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक लढवल्यास भाजप दक्षिणेतील जागा जिंकू शकेल. मुख्यमंत्री रिंगणात नसल्यास भाजपला दक्षिण गोवा जिंकणे कठीण होऊ शकते, असे ते उपहासाने पुढे म्हणाले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या मतदारसंघात आरामात विजय मिळवता आलेला नसताना दक्षिण गोव्याची जागा जिंकण्याचा मुख्यमंत्र्यांना इतका विश्वास का वाटत आहे हे जाणून घेण्याची इच्छा सरदेसाई यांनी व्यक्त केली.
सासष्टीचे मतदार सहजासहजी झुकणारे नाहीत
काँग्रेस आमदारांना पक्षांतराच्या रडारवर ठेवण्याचा आणि चांगल्या विनोदाने प्रेरित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते. सासष्टीतील मतदार हे सहजासहजी झुकणारे लोक नाहीत, असे ते म्हणाले. दक्षिण गोव्याची जागा जिंकण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दाखविणे अपेक्षित आहे. अन्यथा त्यांची बदली होऊ शकते. कारण त्यांच्यानंतरची दुसरी व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची प्रतीक्षा करत आहे, असे उद्गार सरदेसाई यांनी काढले. दुसरीकडे, आमदार दिगंबर कामत यांनी मुत्सद्दी प्रतिक्रिया दिली. दक्षिण गोव्यातील लोक त्यांच्या विवेकबुद्धीनुसार मतदान करतील. हे आम्ही यापूर्वी पाहिलेले आहे. शेवटी जनताच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.









