“हल्लीच्या पिढीतल्या मुलांवर चांगले संस्कार झालेले नसतात’’, हे वाक्य गेली अनेक दशके प्रत्येक पिढीतले पालक सांगत आले आहेत. संस्कार करण्याची जबाबदारी मागच्या पिढीवरच असते, तरीही प्रत्येकाला पुढची पिढी बिघडली आहे असे का वाटते? संस्कार म्हणजे नेमके काय?
संस्काराच्या संकल्पना प्रत्येक पिढीप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे संस्कार म्हणजे नेमके काय याबद्दल कोणीही ठोसपणे सांगू शकत नाही. संस्कार म्हणजे जीवनमूल्ये असतील तर ती तत्वे काळाप्रमाणे बदलत असतात. काल जे योग्य होते ते आज अनुचित असेल आणि उद्या तो गुन्हा मानला जाऊ शकतो. ‘शुभंकरोती कल्याणम’ म्हणणे हा संस्कार आता रद्दबातल झाला आहे कारण ‘दिव्याला पाहून नमस्कार’ का करायचा याचे तार्किक कारण पालक सांगू शकत नाहीत. ‘शत्रूबुद्धी विनाशाय’ हे तत्व पालक आचरणात आणू शकत नसतील तर मुलांनी पाठांतर करून उपयोग काय? त्याऐवजी ‘हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ अशी प्रार्थना आचरणात आणण्याची आज सर्वात जास्त गरज आहे. (समीर सामंत-कौशल इनामदार).
पावकी, पाउणकी, अडीचकी, सव्वाकी असे अनेक पाढे आजोबा-पणजोबांच्या काळात घोकले जात होते. तसे पाढे पाठ करण्याची आता आवश्यकता नाही. त्यामुळे असे पाढे असलेला परवचा रोज संध्याकाळी डोके न चालवता म्हणणे, हा आता संस्कार होऊ शकत नाही. तर्खडकरांची पुस्तके पाठ करून कोणालाही चांगले इंग्रजी बोलता आले नाही, आताच्या काळात तसे होण्याची सुतराम शक्मयता नाही. मुळात पाठांतर करण्याचे दुष्परिणाम भीषण आहेत. आजच्या काळात पोथीनि÷ होण्यापेक्षा प्रश्न विचारण्याला जास्त महत्त्व आहे. त्याचेच संस्कार पालकांनी आज करण्याची गरज आहे, कारण संस्काराची संकल्पना काळानुसार बदलत असते. पूर्वीच्या काळी ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ ही म्हण हिंसक मनोवृत्तीच्या पालकांमध्ये लोकप्रिय होती. या उक्तीमध्येच विरोधाभास आहे. त्याची कृती करणाऱया पालकांनी समाजावर असलेला राग बालकांवर काढल्याचे अनेकांनी अनुभवले असेल. विद्या कधीही छडीच्या किंवा कोणाच्याही धाकाने येत नसते. वयाने मोठे असल्यामुळे लहान वयाच्या व्यक्तीवर हात उगारण्याचा हक्क कोणालाही नसतो. खरेतर तो हिंसाचार आहे. शिस्त लावण्यासाठी हात उगारण्याची गरज नसते. कधीही पुस्तक हातात न धरणारे आई-वडील आपल्या मुलांना अभ्यास करण्याचे ‘वळण’ लावू शकत नाहीत. एखादी व्यक्ती निव्वळ वयाने मोठी आहे, म्हणून त्यांना नमस्कार करण्याची सवय आता पुढच्या पिढीला लावून चालणार नाही. ती व्यक्ती नमस्कार करण्यायोग्य का आहे, हे पालकांनी आपल्या मुलांना पटवून द्यावे, त्यांना पटले, तर आपसूक चरणस्पर्श केला जाईल. अन्यथा आताची पिढी निव्वळ वयाचा मान राखून कोणापुढेही मान तुकवणार नाहीत. म्हणूनच संस्कार काळाप्रमाणे बदलण्याची गरज आहे.
घरातील मोठी माणसे बाहेर जातात त्यावेळी कुठे निघालात असे विचारू नये, असे संस्कार आता चालणार नाहीत. पुढच्या पिढीने अधिकाधिक प्रश्न विचारावेत. थोरा-मोठय़ांना उत्तरे देणे अवघड जात असेल तर त्यांनी पालकत्वाचे प्रशिक्षण घ्यावे. आपले वडील मित्राबरोबर ‘औषध पितो आहे’ असे उत्तर देत आहेत म्हणजे नेमके काय याचे उत्तर पूर्वीच्या पिढीला माहित होते परंतु आताची पिढी “काहीही काय सांगताय?’’ असे उत्तर देऊन त्याचा तपशील सांगू शकेल. आई वडिलांनी वाहन चालवताना सिग्नलचे नियम (ट्रफिक पोलीस नसतानाही) पाळणे, हा संस्काराचा भाग झाला. मूल्यशिक्षण हे आई-वडिलांनी आणि शिक्षकांनी त्यांच्या आचरणातून देणे अपेक्षित असते. टीव्हीवर कौटुंबिक मालिका नियमितपणे पाहणाऱया पालकांची मुले-मुली टीव्हीवर असेच निर्बुद्ध कार्यक्रम बघण्यात वेळ वाया घालवतात. घरातल्या स्त्रीला दुय्यम वागणूक देणारे पालक पुढच्या पिढीला वेगळेच ‘वळण’ लावतात. दररोज नित्यनियमाने वाचन करणारे आई वडील वाचनाचे संस्कार पुढच्या पिढीवर करत असतात. “लोका सांगे ब्रह्मज्ञान…’’ हे पूर्वीच्या काळी चालायचे, परंतु आताची पिढी त्यातला फोलपणा हेरून त्यावर प्रश्न विचारती झाली आहे. तार्किक विचार करण्यास पुढच्या पिढीला शिकवले नाही तर त्यांचे शिक्षण ‘घोका आणि ओका’ या पलीकडे जाऊ शकणार नाही. मुंज करणे हा आजच्या काळात संस्काराचा भाग नाही कारण ती पद्धत केव्हा सुरु झाली याचा विचार करायला हवा. ज्यावेळी शाळा नव्हती, त्यावेळी फक्त मुलांना गुरूगृही पाठवताना मुंज केली जायची. त्यावेळी मुलींना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती कारण आपला समाज मागासलेला होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शाळा समाजाचा विरोध डावलून सुरु केल्या. त्यामुळे आज मुलींना शिक्षण देण्याबद्दल समाज जागृत झाला आहे. अशी कोणतीही व्रतवैकल्ये त्याचा कार्यकारणभाव आणि त्या काळातला उद्देश लक्षात न घेता निव्वळ प्रथा म्हणून केल्यास त्याचे दुष्परिणाम जास्त संभवतात. म्हणूनच संस्कार काळाप्रमाणे बदलतात. ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ या संकुचित वृत्तीपेक्षा आपले अंथरूण मोठे करण्याचे संस्कार आता करण्याची गरज आहे. ‘आयुष्यभर आमच्याजवळ रहा’ यापेक्षा ‘सोड सोन्याचा पिंजरा’ ही शिकवण म्हणजे संस्कार. ‘खिलाडूवृत्ती जोपासणे’, ‘सर्वांबरोबर मिळून मिसळून वागणे आणि एकत्रितपणे एकमेकाला मदत करून काम करणे’, ‘चूक झाल्यावर तत्परतेने क्षमा मागणे’ याचे प्रत्यंतर पालकांच्या वर्तनातून दिसल्यास मुले त्या गुणांचा अंगीकार करतात. शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्यावर लगेच संस्कार वर्ग घेण्याची काही ज्ये÷ नागरिकांना प्रबळ इच्छा होत असते. अशा वर्गात अर्थ माहित नसलेले श्लोक, मंत्र इथे पाठ करून घेतले जातात, सुरस आणि चमत्कारिक बोधप्रद गोष्टी सांगितल्या जातात. गोष्ट सांगितल्यावर वेगवेगळय़ा मुलांनी वेगवेगळे निष्कर्ष काढल्यास बुद्धीला चालना मिळू शकते. परंतु तसे संस्कार वर्गात शिकवले जात नाहीत. त्यामुळे संस्कार वर्गातून मुले बाहेर पडतात त्यावेळी मुले घरी जातात आणि संस्कार वर्गातच राहतात. पसायदान पाठ करण्यापेक्षा त्याचा अर्थ लक्षात घेऊन तो पालकांनी आचरणात आणणे गरजेचे आहे.
“आमच्या काळी….’’ अशी रेकॉर्ड सतत वाजवणारे पालक-ज्ये÷ नागरिक पुढच्या पिढीला पूर्वीही आवडत नव्हते, आताही आवडत नाहीत. खरे तर दोन पिढय़ांमध्ये सुसंवाद कमी आणि अंतरच जास्त असते. याचे कारण प्रत्येक पिढीची भाषा वेगळी असते. प्रत्येक पिढी कशी बदलत गेली याचा साकल्याने विचार केल्यास संस्काराची परिभाषा बदलण्याची गरज जाणवते. 1901 पासून 1927 पर्यंत जन्म झालेल्या पिढीला ‘द ग्रेटेस्ट जनरेशन’ म्हणतात. या पिढीने महायुद्धे अनुभवली आहेत. 1928 ते 1945 काळात जन्मलेल्या पिढीला ‘सायलेंट जनरेशन’ म्हणतात. या पिढीतल्या आई-वडिलांनी काही मुल्ये जपली आणि आपल्या मुलांनी त्यामधूनच शिकावे, अशी त्यांची अपेक्षा होती. हे लोक अजूनही ‘स्वातंत्र्यपूर्व काळात’ले व्याख्यान देण्यास उत्सुक असतात. परंतु यांचा पुढच्या पिढीबरोबर सुसंवाद कमी होता. नोकरी करून निवृत्त झाल्यावर मिळालेल्या प्रॉव्हीडंट फंडामधून घर घेण्याची या पिढीची सुखाची परिभाषा होती. त्यामुळे नोकरी लागल्यावर पहिल्या सहा महिन्यात बँक-हप्त्यावर बाईक घेणाऱया नातवाशी या पिढीचे जमत नाही. आज ज्यांचे वय 58 ते 76 वर्षे आहे, त्या ‘बेबी बूम’ जनरेशनने पहिल्यांदा आपल्या पाल्याशी संवाद साधण्यासाठी ‘सहकुटुंब’ चर्चेत भाग घेण्यास सुरुवात केली. पैसे भरल्यानंतर एक-दोन वर्षे वाट बघून बजाज स्कूटर विकत घेणे, ही या पिढीच्या दृष्टीने चैन होती. 42 ते 57 वर्षे वय असलेल्या ‘जेन एक्स’ पिढीने ‘सातच्या आत घरात’ येण्याचे नियम पुढच्या पिढीतल्या मुलींवर लादले. खरे तर स्त्रियांवर बंधने घालण्यापेक्षा पुरुषांवर योग्य संस्कार करण्याची गरज असते परंतु समाज त्याला तयार नव्हता, नसतो. नुकतेच आई-बाप झालेले, होऊ घातलेले 26 ते 41 वर्षे वयाच्या पिढीला ‘जनरेशन वाय’ म्हणतात. या पिढीने तंत्रज्ञानाचा, इंटरनेटचा वाढता वापर अनुभवला आहे आणि पुढच्या पिढीबरोबर सुसंवादासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. या पिढीने स्पष्टपणे बोलणारी, प्रश्न विचारणारी पुढची पिढी बघितली आहे. आता सातवीमध्ये शिकणाऱया मुलांपासून 25 वर्षे वयाच्या युवकांच्या पिढीला ‘जेन झी’ (Z उाहूग्दह) म्हणतात. ही पिढी सतत मोबाईल, टॅब वगैरेच्या स्क्रीनला चिकटलेली असते.
यानंतरच्या ‘अल्फा जनरेशन’ पिढीला म्हणजेच नुकत्याच जन्मलेल्या बालकांपासून सहावीत शिकणाऱया मुला-मुलींना ‘माणूस सोशल मीडियाशिवाय कसा राहिला?’ हे कोडे पडलेले असते. या पिढीतली मुले खेळायला गेली तरीही एकत्र बसून मोबाईलवर गेम खेळत असतात. तोच त्यांचा संवाद असतो. त्यामुळे या विविध जनरेशनमध्ये सुसंवाद होण्यासाठी पालकांना काय करता येईल, याबद्दल तपशील पुढच्या लेखात.
सुहास किर्लोस्कर









