निर्णय घेण्यासाठी अभ्यास करून अहवाल देण्याचा केंद्र सरकारचा मुख्य सेनानींना आदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनने तैवानवर हल्ला केला तर भारताची भूमिका काय असेल ? हा विषय सध्या भारताच्या संरक्षण वर्तुळात चर्चिला जात आहे. चीनचा पवित्रा पाहता तो तैवानवर हल्ला करुन तो देश आपल्या ताब्यात घेण्याच्या विचारात आहे, असे अमेरिकेचे मत आहे. त्यामुळे अमेरिकेने आपल्या सर्व मित्र देशांना अशा स्थितीत त्यांच्या भूमिकेविषयी विचारणा केली आहे. त्यामुळे भारताने आपल्या मुख्य सेनानींना या संबंधी सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे.
केंद्र सरकारने ही सूचना भारताच्या संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांना सहा आठवड्यांपूर्वी दिली होती. त्यानुसार हा अभ्यास करण्यात येत आहे. चीन-तैवान युद्धास प्रारंभ झाल्यास भारताने काय करावे, अशा युद्धाचा भारतावर कशाप्रकारे परिणाम होईल, तसेच भारताच्या सैन्यबळावर त्याचा प्रभाव कसा पडणार आहे, याची पडताळणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
विविध पैलू तपासणार
या अभ्यासात भारताच्या सेनादलांचे प्रमुख विविध पैलूंचा विचार करणार आहेत. या युद्धात भारताने सहभाग घ्यावा का ?, घेतला तर कशा प्रकारे घ्यावा ?, युद्धात तैवानच्या बाजूने थेट उतरावे की चीनविरोधात युद्ध करणाऱ्या देशांना साधनसामग्री साहाय्य (लॉजिस्टिक सपोर्ट) देऊ करावे ? आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
भारताच्या रशिया मैत्रीची परीक्षा
रशियाने युक्रेनशी युद्ध छेडल्याने अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. तसेच रशियाशी संरक्षण संबंध ठेवणाऱ्या देशांवरही निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. मात्र, भारताचे रशियाशी बळकट संरक्षणसंबंध असूनही अमेरिकेने भारताला निर्बंधांतून मुक्त ठेवले आहे. या संदर्भात अमेरिकेने भारताची परिस्थिती समजून घेतली आहे. मात्र, तैवानवर चीनने हल्ला केल्यास आणि रशियाने चीनची बाजू घेतल्यास भारताच्या परस्परविरोधी देशांशी मैत्रीचे संबंध ठेवण्याच्या धोरणाची अग्निपरीक्षा होणार आहे. कारण, अमेरिका या स्थितीत भारताच्या दोन्ही बाजूंशी मधुर संबंध ठेवण्याच्या धोरणाला आक्षेप घेणार हे उघड आहे.
कालावधी निश्चित नाही
चीन-तैवान युद्ध सुरु झाल्यास आणि रशियाची भूमिका अमेरिकेच्या विरोधातली असल्यास भारताला रशिया आणि अमेरिका या दोन देशांपैकी एकाची बाजू घ्यावीच लागणार आहे. तशी वेळ आल्यास भारताची सामरिक बळाची स्थिती काय आहे आणि जो निर्णय घेतला जाईल, त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील, याची चाचपणी भारत करीत आहे. यासंबंधी विविध मते व्यक्त होत आहेत.
मतमतांतरे
काही युद्धतज्ञांच्या मते असे युद्ध केवळ लघुकालीन असल्यास भारताने चीनविरोधात कठोर टिप्पणी केली तरी ते पुरेसे ठरु शकते. मात्र, युक्रेन युद्धाप्रमाणे हे युद्ध लांबल्यास भारताला निर्णायक भूमिका घ्यावीच लागेल. सेनेच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या मते भारताने थेट युद्धात न उतरता चीनविरोधी देशांना सामग्री साहाय्य पुरवावे. यात अन्नधान्ये, इंधन पुरवठा, युद्धनौकांना बंदरे पुरविणे, त्यांची दुरुस्ती करण्याची सुविधा देणे, युद्धविमानतळांचा उपयोग करु देणे इत्यादी साहाय्याचा समावेश करता येणे शक्य आहे. तर काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भारत चीनचे सामर्थ्य विभाजित करण्यासाठी उत्तरसीमेवर त्या देशाविरोधात आघाडी उघडू शकतो. जो निर्णय घेतला जाईल, तो त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला जाणे आवश्यक आहे, असे केंद्र सरकारचे मत आहे.









