जळगाव / प्रतिनिधी :
आमचे हिंदुत्व शेंडीचे नसून राष्ट्रीयत्व तेच आमचे हिंदुत्व आहे. आता भाजपने त्यांचे हिंदूत्व कोणते, हे जाहीर करावे, असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.
जळगावच्या पाचोरा येथील सभेत ते बोलत होते. या सभेला उपस्थितांची मोठी गर्दी होती. सभेत घुसू म्हणणाऱ्यांना सांगतो, अशा घुसा मी खूप पाहिल्या आहेत, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सुनावत उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या हे उलट्या पायाचे सरकार सत्तेवर आहे. मुळात हे अवकाळी सरकार आहे. या सरकारने अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी मदत केली? कुठेतरी यांनी मदत केली, हे दाखवा. पाठीवरती सोडा पण आईच्या कुशीवर वार करणारी औलाद आपली असूच शकत नाही. ढेकूण मारण्यासाठी तोफेची गरज नाही. एका बोटानेही ते मरतील, असे फटकारत मला आश्यर्य वाटते, की माझ्याकडे काहीच नाही. नाव चोरले, चिन्ह चोरले परंतु, तुम्ही माझ्याबरोबर आहात, हे मोठे बळ आहे. त्यामुळे आमचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक सत्य बोलले म्हणून त्यांना टार्गेट करणे सुरू झाले आहे. त्यावर देशाचे गृहमंत्री म्हणतात ते राज्यपाल होते तेव्हा का बोलले नाहीत? आता त्यांना विचारतो तुम्ही विरोधकांवर धाडी टाकता आणि तुमच्यात ते सामिल झाल्यावर ते शुद्ध होतात आणि आमच्यामध्ये असताना भ्रष्ट कसे असतात? याचा अर्थ इतकाच, की भाजपला देशामध्ये इतर पक्ष नको आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. आजच्या सभेला एकनाथ खडसे येणार होते. ते व्यासपीठावर असते तर बरे झाल असत. कारण 2014 ला भाजपने एकनाथ खडसेंना पुढे करून मला आपली युती तुटली, असे सांगायला लावले. खडसे यांना पुढे करण्याचे कारण म्हणजे भाजपला स्वपक्षातील लोकही नको आहेत, असा होतो. त्याचबरोबर जे आपल्याबरोबर आहेत त्यांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावली जाते, असा आरोप त्यांनी केला, असा आरोप त्यांनी केला. तुम्हाला मी कुटुंब प्रमुख वाटतो, की मिंधे तुमचा वाटतो, असा प्रश्न उपस्थित करत जर निवडणुक झाली तर पाचोऱ्यात गद्दारांना गाडल्याशिवाय तुम्ही राहणार की नाही असा प्रश्नही उपस्थितांना केला. तुम्ही धनुष्य घेऊन लढा. मी मशाल घेतो. होऊन जाऊदे निवडणूक. दाखवा धमक, असे आव्हानही त्यांनी या वेळी दिले.








