बाजार समितीत मुलभूत सुविधा देण्याचे नुतन संचालक मंडळासमोर आव्हान
शेतकरी, व्यापाऱ्यांसह संबंधित घटकांकडून वाढल्या अपेक्षा
कोल्हापूर /धीरज बरगे
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या पंचवीस वर्षात चालढकल कारभार सुरु आहे.रस्ते, गटारी, स्वच्छतागृह, निवास व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, कोल्ड स्टोअरेज, हमीभाव केंद्र अशा मुलभुत सुविधांपासुन येथील शेतकरी, व्यापारी गेल्या अडीच दशकांपासून वंचित आहे. त्यांना या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आव्हान नुतन संचालक मंडळासमोर आहे. निवडणुकीत सुविधा देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकरी, व्यापारी यांच्या नुतन संचालक मंडळाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनीही विकासाचा अजेंडा राबवणार असल्याचे सांगितल्याने त्यांचीही जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत बाजार समितीचा खरोखर विकास होणार का, ये रे माझ्या मागल्या या म्हणीचा प्रत्यय येणार हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असूनही येथे मुलभूत सुविधांचा दुष्काळ गेल्या पंचवीस वर्षांपासून पडला आहे. समितीमध्ये कांदा, बटाटा, लसूण, गूळ, धान्य, भाजीपाला, फळे, चिवा, बांबू यांची आवक होते. यामधून कोट्यावधींची उलाढाला बाजार समितीमध्ये होते. ज्या शेतकरी, व्यापारी, ग्राहक यांच्याकडुन आकारल्या जाणाऱ्या करावर बाजार समितीचा डोलारा उभा आहे, त्यांना साधी पिण्याची पाण्याचीही सुविधा पुरविण्यात बाजार समिती प्रशासन अपयशी ठरले आहे. यंदाच्या निवडणुकीत मुलभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित झाल्याने या सुविधा पुरविण्याचे आश्वासन सत्ताधारी आघाडीने दिले आहे. त्यांचे हे आश्वासन सत्यात उतरणार का केवळ मतापुरतेच मर्यादित राहणार हे येणारा काळच ठरवणार आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे डांबरीकरण करा
बाजार समितीमधील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. उन्हाळा, हिवाळ्यात धुळीचे तर पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. गेल्या अनेक वर्षांपासुन अंतर्गत रस्ते न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी समितीमधील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
एकच शौचालय, स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था
संपूर्ण बाजार समितीमध्ये एकच शौचालय आहे. तर स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली आहे. बाजार समितीमध्ये कांदा बटाटा, गुळ मार्केट येथे शौचालये उभारण्यात यावीत. स्वच्छतागृहांचीही डागडूजी करण्यात यावी. तसेच महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही, त्यामुळे महिलांची मोठ्याप्रमाणात गैरसुविधा होते. महिलांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृह व शौचालय उभारणे गरजेचे आहे.
वाहतुक कोंडीवर उपाययोजना आवश्यक
बाजार समितीच्या संरक्षक भिंतीलगत अनेक अतिक्रमणीत व्यवसाय सुरु आहेत. याचा अडथळा वाहतुकीस होतो. सकाळी नऊ ते अकरा यावेळेत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतुक कोंडी होते. प्रवेशद्वारावर गेटपास तपासणीमुळेही वाहनांची रांग लागते. सर्वांसाठी एकच मार्ग असल्याने समितीमध्ये येणाऱ्या खासगी वाहनांनाही याच रांगेत थांबावे लागत असून त्यांच्या बराच वेळ वाया जात आहे. त्यामुळे वाहतुक कोंडीवर उपाययोजना करण्यासासह समितीमध्ये येणाऱ्या खासगी वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग करण्याची मागणी होत आहे.









