काल खऱ्या अर्थाने भारताचा स्वप्नभंग झाला. अख्ख्या स्पर्धेत पूर्ण गाजावाजा झालेला संघ ढेपाळला असं मी म्हणणार नाही. परंतु एका दादा टीमकडून जी कामगिरी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. अंतिम सामन्यात टॉसचा महत्त्वपूर्ण कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला आणि त्यानंतर त्यांनी घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय सर्वांनाच बुचकळ्यात टाकून गेला होता.
रोहित शर्माने पहिल्या 10 षटकात पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला, जो प्रयत्न त्यांनी या पूर्ण स्पर्धेत यशस्वी करून दाखवला. परंतु कालच्या सामन्यात मॅक्सवेलच्या एका षटकात दहा धावा येऊन सुद्धा पुन्हा त्याला भिरकवण्याचा जो प्रयत्न झाला तो प्रयत्न फसला. आणि पॅट कमिन्सने रोहितसाठी जे जाळे टाकलं होतं त्या जाळ्यात तो अलगद अडकला. 1975 पासून ते 2019 पर्यंत ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाजाने खेळलेले अवसानघातकी फटके संघाला कसे रस्त्यावर आणू शकतात, याचा उल्लेख मी वारंवार करत आलो. रोहितच्या याच फटक्याची पुढील वर्ल्ड कपपर्यंत क्रिकेटप्रेमींना याची आठवण झाली नाही तरच नवल. त्यानंतर श्रेयस अय्यर झटपट बाद झाल्यानंतर कोहली आणि केएल राहुलला खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचे होते. अर्थात त्यात ते यशस्वी झाले. परंतु ज्या पद्धतीने एकेरी दुहेरी धावा यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या पार्ट टाइम बॉलरच्या षटकातही एक दोन धावा निघायला लागल्या. मधल्या षटकात भले चौकार निघाले नसते परंतु एकेरी दुहेरी धावा निघाल्या असत्या तरी धावफलकावर फार मोठा फरक पडला असता. ऐनवेळी विराट कोहलीचे बाद होणं ऑस्ट्रेलिया संघाच्या पथ्यावर पडलं. गंमत बघा, अंतिम सामन्यात पहिली 10 षटकं निर्णायक ठरली. पहिल्या दहा षटकात सेट झालेला रोहित शर्मा भारतातर्फे बाद झाला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड सेट झाला. आणि त्यानंतर त्याने नेमकं काय केलं हे आपण सर्वजण जाणताच.
दुसऱ्या बाजूने पॅट कमिन्सचं कौतुक करावं लागेल. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याअगोदर, कर्णधारपदाची धुरा त्याने फक्त चार सामन्यातच सांभाळली होती. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर त्याच्या नेतृत्वात त्याने घेतलेली भरारी निश्चितच कौतुकास्पद. कालच्या सामन्यात त्याने सजवलेले क्षेत्ररक्षण आणि त्याने केलेला टिच्चून मारा हा कमालीचा प्रभावी होता. दुसऱ्या बाजूने भारतीय संघाने तीन झटपट गडी बाद केल्यानंतर शमी आणि बुमराहचा मारा आणखी चार ते पाच षटके कायम ठेवला असता तर एक दोन बळी मिळू शकले असते. दुसऱ्या बाजूला सिराजला थोडंसं उशिरा का आणलं हे न उलगडणारंच कोडं होतं. दुसरीकडे काल जडेजा आणि कुलदीप थोडेसे कमजोर वाटले. त्यातच हेडने धावफलक हलता ठेवत आक्रमक फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांची हवाच काढून घेतली. थोडक्यात काय तर ऑस्ट्रेलियाचे टॉसपासून सर्व फासे योग्य पद्धतीने पडत गेले. काल मला रोहित शर्माचे एक आश्चर्य वाटलं, ज्या सिराजचा वापर सामन्याच्या सुरुवातीला करायला पाहिजे होता तो त्यांनी जवळपास 15 व्या षटकात केला. त्यामुळे प्रत्येक मॅचला फर्स्ट चेंज म्हणून शमी यायचा आणि समोरच्या संघाला खिंडार पाडायचा. ती किमया सिराजकडून बघायला मिळाली नाही.
असो. आपण सर्व कारणे दिले तरी ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन करायलाच हवं. पक्कं व्यावसायिक क्रिकेट कसे खेळावे हे त्यांच्याकडून शिकायलाच हवं. परंतु एवढं करून एकंदरीत भारताची कामगिरी खराब झाली आहे का? तर मुळीच नाही. परंतु आपण ज्याच्यासाठी लढत आहोत, त्या निर्णायक सामन्यात चांगली कामगिरी केली असती तर निश्चितच करोडो भारतीय सुखावले असते. अर्थात या पराभवातून भारतीय संघाने बरंच काही शिकलं पाहिजे. अंतिम सामन्यात नेमकी काय रणनीती असली पाहिजे हे त्यांनी अवगत करून घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने दाखवून दिल आम्हीच जगज्जेत्ते आहोत. आणि आम्ही का आहोत हे त्यांनी कालच्या सामन्यात सिद्ध केलं. चार वर्षातून भरणारा हा क्रिकेटचा कुंभमेळा अचानक हातातून निसटून गेला याचं दु:ख अजून काही महिने तरी निश्चितच पचवता येणार नाही एवढं मात्र खरं.!









