भारतीय संघाची इंग्लंडमधील मालिका आता मागं पडलीय अन् सर्वांना वेध लागलेत ते आगामी आशिया चषक टी-20 स्पर्धेचे…येत्या वर्षी टी-20 विश्वचषक रंगणार असल्यानं या स्पर्धेला आणखी महत्त्व प्राप्त झालंय. नुकताच त्यासाठी संघ जाहीर करण्यात आला असून त्यात श्रेयस अय्यरसारख्या तगड्या फलंदाजाला स्थान न मिळाल्यानं सर्वांनाच धक्का बसल्याशिवाय राहिलेला नाहीये…मर्यादित षटकांच्या सामन्यातील अलीकडची कामगिरी व खास करून ‘आयपीएल’मध्ये दाखविलेला फॉर्म पाहता मुंबईचा हा खेळाडू त्यात झळकायला हवा होता… ‘त्यानं’ भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी आणखी काय करायला हवंय ?…‘त्याचा’ भारताच्या आशिया चषक टी-20 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूत समावेश करण्यात आलेला नाहीये. त्यामुळं देशातील क्रिकेट विश्वाशी संबंधित असलेला प्रत्येक विश्लेषक, टीकाकार आणि सर्वसामान्य रसिक अक्षरश: गोंधळून गेलेत…नाव : श्रेयस अय्यर…
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या मते, ‘ही श्रेयसची चूक नाहीये तसंच निवड समितीला देखील दोष देणं अयोग्य. कारण समितीला हक्क आहे तो 15 खेळाडूंचीच निवड करण्याचा. त्याला संधीसाठी वाट पाहावी लागेल’…श्रेयस अय्यरचा समावेश संघात होणार याची खात्री जवळपास प्रत्येकाला होती. परंतु पाच राखीव खेळाडूंत सुद्धा त्याला स्थान देण्यात आलेलं नाहीये. विशेष म्हणजे निवड समितीला शिवम दुबे नि रिंकू सिंग यांचा फलंदाजीचा दर्जा त्यांच्यापेक्षा वरचा वाटतोय. यष्टीरक्षक ध्रुव जुरेल व अष्टपैलू रियान परागला देखील राखीव खेळाडूंसाठीच्या खुर्चीवर बसविण्यात आलंय… भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील काही जणांनुसार, श्रेयस अय्यरसारख्या अनुभवी खेळाडूला राखीव गटात बसविणं योग्य ठरलं नसतं. जर त्याची निवड केली असती, तर अंतिम 11 सदस्यांच्या चमूत स्थान द्यावंच लागलं असतं. कुणाचाही त्याच्यावर रोष नाहीये. त्याला येऊ घातलेल्या भविष्यात भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची खात्रीनं संधी मिळेल अन् तो क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपांत झळकताना दिसेल…
भारताचे माजी साहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी निवड समितीवर टीका करताना म्हटलंय, ‘मला त्याला वगळण्यामागचं कारणच कळत नाहीये. राखीव खेळाडूंत देखील स्थान न मिळणं हे फार धक्कादायक. याचाच अर्थ निवड समितीच्या डावपेचांत त्याला स्थान नाहीये’….भारताचे माजी प्रसिद्ध ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांनाही हा निर्णय अजिबात रूचलेला नाही. ‘यू-ट्युब’वरील ‘अॅश की बात’ या आपल्या कार्यक्रमात त्यांनी म्हटलंय, ‘श्रेयस अय्यरनं मजबूत कामगिरीचं दर्शन नेहमीच घडविलंय व तो एक दर्जेदार खेळाडू. चॅम्पियन्स चषक स्पर्धा भारताला जिंकणं शक्य झालं ते त्याच्या अफलातून कामगिरीमुळंच. जर शुभमन गिलची निवड तो फॉर्मात असल्यानं झालेली असेल, तर श्रेयस देखील फॉर्मातच होता. या सर्व प्रश्नांचं उत्तर देणार तरी कोण? त्यानं काय चूक केलीय?’
‘माझ्या मते अय्यर व यशस्वी जैस्वाल यांना वगळणं फार चुकीचं. श्रेयसनं ‘केकेआर’चं कर्णधारपद इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 सालच्या मोसमात भूषविल होतं आणि संघानं त्यावेळी जेतेपद सुद्धा मिळविलं. त्यानंतर त्याच्या मार्गदर्शनखाली खेळणाऱ्या पंजाबच्या संघानं 2014 नंतर प्रथमच अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. त्याला आखडू टप्प्याच्या चेंडूचा भूतकाळात त्रास झालेला असला, तरी आता त्यानं त्यावर उत्तर शोधून काढलंय आणि ‘आयपीएल’मध्ये कागिसो रबाडा व जसप्रीत बुमराह यांना अगदी सहज तोंड दिलंय. मी त्याला वगळल्यामुळं निराश झालोय’, अश्विनचे शब्द…
श्रेयर अय्यरचे वडील संतोष अय्यर यांनीही निराशा व्यक्त केलीय…‘श्रेयसनं भारतीय टी-20 संघात स्थान मिळविण्यासाठी आणखी काय करायला हवंय तेच मला कळत नाहीये. दिल्ली कॅपिटल्स, कोलकात नाईट रायडर्स, पंजाब किंग्स यांचं प्रतिनिधीत्व करताना त्यानं आयपीएलमध्ये खोऱ्यांनी धावा जमविल्याहेत. शिवाय कर्णधारपद देखील भूषविलंय. भारतीय संघात त्याला जागा मिळालेली नसली, तरी त्याच्या चेहऱ्यावर निराशा मात्र अजिबात नव्हती…
श्रेयस अय्यरच्या खेळाचं विश्लेषण केल्यास असं दिसेल की, त्यानं नेहमीच संघाची जबाबदारी खांद्यावर पेललीय. प्रथम फलंदाजी करणं असो वा लक्ष्याचा पाठलाग करणं त्याला त्यात फरक दिसत नाही. त्यानं प्रत्येक वेळा त्याच्या धावांच्या भुकेचं दर्शन घडविलंय…वाईट वाटण्याजोगी बाब म्हणजे श्रेयस अय्यरनं आशिया चषकासाठीच्या संघात खात्रीनं स्थान मिळेल या विश्वासानं मुंबई क्रिकेट संघटनेच्या बीकेसी स्टेडियमवर पांढऱ्या चेंडूनं सरावाला देखील प्रारंभ केला होता. या त्याच्या साऱ्या प्रयत्नांवर इमाने इतबारे पाणी फेरलंय ते निवड समितीनं…अर्थात ही काही अखेर नाही अन् हा काही टी-20 विश्वचषकासाठीचा संघ नाही ही गोष्ट वेगळी…
दरम्यान, या नाट्यात आणखी भर पडलीय ती अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीनं शुभमन गिलला टी-20 संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करून त्याच्याकडे सर्व स्वरुपांतील नेतृत्व सोपविण्याचे जोरदार संकेत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंडळ नि निवड समिती एकदिवसीय सामन्यांसाठी वेगळ्या पर्याय चोखाळू पाहत असल्याचं समोर आल्यानं…सदर वृत्तात दावा करण्यात आलाय तो श्रेयस अय्यरचा एकदिवसीय संघाचा भावी कर्णधार म्हणून विचार चालल्याचा. अद्याप यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसला, तरी अय्यरकडे 50 षटकांच्या सामन्यात भारताचं नेतृत्व करण्यासाठी दीर्घकालीन पर्याय म्हणून पाहिले जातंय अन् कदाचित 2027 च्या विश्वचषकापर्यंत त्याच्याकडे ही धुरा सोपविली जाऊ शकते…
ही घडामोड श्रेयसच्या जखमांवर निश्चितच मलमपट्टी लावून जाईल. तथापि, त्याची बढती अवलंबून असेल ती रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्याबाबतच्या निर्णयावर. सध्या एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणारा रोहित 38 वर्षांचा झालाय. तो आणि विराट कोहली आधीच टी-20 नि कसोटीतून निवृत्त झालेत. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविऊद्ध ऑक्टोबरमध्ये होणारी एकदिवसीय मालिका हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांचा शेवटचा सहभाग ठरू शकतो अशी अटकळ वाढत चाललीय!
श्रेयसची दमदार कामगिरी…
- श्रेयसला वगळणं फार फार आश्चर्यकारक. कारण त्याचे टी-20 तील आकडे वेगळीच कहाणी सांगतात. 3 डिसेंबर, 2023 हा दिवस आठवतोय ?…त्यानं बेंगळूर इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 37 चेंडूंत 53 धावा तडकावल्या होता अन् भारतानं तो सामना खिशात घातला होता 6 धावांनी…
- 6 डिसेंबर, 1994 रोजी मुंबईत जन्मलेल्या श्रेयस अय्यरनं एकूण 51 टी-20 सामन्यांमध्ये 30.67 च्या सरासरीनं आणि 136.12 च्या स्ट्राईक रेटनं फटकावल्या आहेत त्या 1,104 धावा…
- ‘पंजाब किंग्स’नं यंदा कर्णधारपदाची जबाबदारी सोपविलेल्या त्या खेळाडूवर ओतले होते तब्बल 26 कोटी 75 लाख रुपये. त्याच्याहून अधिक महागडा करार झाला होता तो फक्त रिषभ पंतशी (27 कोटी रुपये)
- यावर्षीच्या ‘आयपीएल’मध्ये अय्यरनं 17 लढतींत 50.33 च्या सरासरीनं नि 175.07 च्या स्ट्राईक रेटनं 604 धावा जमविल्या, यामुळं ‘पंजाब किंग्स’ अंतिम फेरीत पोहोचू शकला…
- विशेष म्हणजे त्यानं 1 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या ‘क्वालिफायर’मध्ये मुंबई इंडियन्सविऊद्ध 41 चेंडूत नाबाद 87 धावांची आतषबाजी केली. यामुळं पंजाबला 204 धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग करता आला…
- भारतानं जिंकलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत त्यानं 48.6 च्या सरासरीनं काढल्या त्या एकूण 243 धावा (स्ट्राईक रेट 79.41)…त्यात समावेश राहिला तो 15, 56, 79, 45 व 48 अशा सातत्यपूर्ण खेळींचा…
– राजू प्रभू









