तुमचा मुलगा करतो काय? म्हणजेच तरुण पिढी करतेय काय? अनेक पालक मान्य करतील की त्यांच्या मुलाचा बराच वेळ मोबाईलमध्ये जातो. मोबाईलवर जे काही फॉरवर्ड केले जाते तीच बातमी समजली जाते, आलेल्या फॉरवर्डला इतिहास समजले जाते. त्यामुळे कोणाच्यातरी एका इशाऱ्यावर सगळे युवक कुठेही जमा होण्यास तयार असतात. असे होण्याचे कारण अशा युवकांकडे काम-धंदा नाही आणि अभ्यासू वृत्ती नाही. आपला मुलगा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्या-उपनेत्याची, भावी नेत्याची हुजुरेगिरी करण्यात तर तो वेळ घालवत नाहीये ना, याची खातरजमा पालकांनी करण्याची वेळ आली आहे. कारण तुम्ही राजकारण्यांचे सख्खे नातेवाईक नसाल तर तुम्हाला राजकारणाकडे करियर संधी म्हणून बघता येत नाही. शिवाय त्यासाठी लागणारा पैसा प्रत्येकाकडे असेलच असे नाही. त्यामुळे अशी काही पार्श्वभूमी नसेल तर वर्षानुवर्षे राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या कट्ट्यावर बसणे, साहेब-दादा-भाऊ-काका वगैरेंनी सांगितलेली सर्व कामे करणे यामध्ये युवकांची उमेदीची वर्षे निघून जातात आणि हाती काहीच लागत नाही. ज्यांच्याकडे भरपूर काम आहे, ज्यांना त्यांच्या कामाचा पुरेपूर मोबदला मिळतो, ज्यांचा स्वत:चा उद्योगधंदा आहे किंवा ज्यांच्याकडे नाविन्यपूर्ण शिक्षणाची आस आहे ते युवक अशा ठिकाणी एकत्र येण्यात वेळ वाया घालवणार नाहीत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मुलाला नोकरी लागत नाही किंवा जोपर्यंत त्याचा स्वत:चा उद्योगधंदा सुरु होत नाही, तोपर्यंत म्हणजेच तो पूर्णपणे स्वावलंबी होईपर्यंत ‘तो करतो काय?’ इकडे लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.
परदेशात युवकांना योग्य वयात ‘आता तू स्वत: कमव आणि शिक’ असे सांगून त्यांना घराबाहेर परगावी पाठवले जाते. आपल्याकडे मुलाचे लग्न झाले तरीही तो आपल्याच घरी रहावा अशी पालकांची इच्छा असते. पालकांनी वेळेत बोट न सोडल्यामुळे त्यांची पाखरे आकाशात झेप घेत नाहीत. ‘आम्ही तुझ्या शिक्षणावर वाट्टेल तितका खर्च करू, पण तू शिक’ अशी धारणा असलेल्या पालकांची मुले बी.बी.ए. करतात, त्यानंतर लाखो रुपये खर्च करून एम.बी.ए. करतात, त्यानंतरही त्यांना नोकरी मिळत नाही अशी त्यांची तक्रार असते. एम.बी.ए. ही डिग्री बिझनेस करण्यासंदर्भात असूनही असे अनेक पदवीधारक नोकरीच्या शोधात असतात, मार्केटिंगमध्ये एमबीए करूनही युवकांना वत्तृत्व येत नाही. त्यांना नोकरी मिळत नाही, कारण त्यांच्याकडे कोणतेच कौशल्य नसते. इंजिनिअरला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या युवकाने कधी घरातील ट्यूबलाईट बदललेली नसते, नादुरुस्त इस्त्राr उघडून बघितलेली नसते, मिक्सर कशामुळे बिघडला हे त्यांना सांगता येत नाही. म्हणूनच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवकांना सुट्टीच्या दोन महिन्यात कोणतीही नोकरी करण्यासाठी पाठवण्याची गरज आहे. मेडिकल-पॅरा मेडिकल करू इच्छिणाऱ्या युवकांनी सुट्टीच्या काळात औषधाच्या द्कानात दोन महिने काम करण्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. पुढे कधीकाळी स्वत:चा उद्योग करू इच्छिणाऱ्या युवकाने महाविद्यालयाच्या सुट्टीच्या काळात आंबे विकण्याचा उद्योग एप्रिल-मे महिन्यात करून बघावा, दिवाळीचे विविध जिन्नस-आकाशकंदील विकण्याचा उद्योग दिवाळीच्या सुट्टीत करून पहावा. सुट्टीच्या काळात उद्योगधंदा केल्यामुळे पैसे मिळवण्याबरोबरच बोलण्याचे कौशल्य शिकावे लागते. त्यामुळे मिळणारा अनुभव बरेच काही शिकवून जातो. मार्काच्या शर्यतीमध्ये मागे असणाऱ्यांनी प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन पासून कॉम्प्युटर दुरुस्तीसारख्या किमान एका कौशल्यामध्ये प्राविण्य मिळवावे. परंतु यामध्ये पालकांच्या प्रतिष्ठीतपणाच्या संकल्पना आड येतात.
बहुसंख्य मुले बोलण्याच्या कौशल्यात इतर राज्यातील युवकांच्या तुलनेत कमी पडतात. सफाईदारपणे इंग्रजी बोलता येण्यासाठी युवकांनी रियाज करण्याची आवश्यकता आहे. ‘स्पिकिंग कोर्स’ लावल्यामुळे असे कौशल्य शिकता येत नाही कारण इतरत्र न बोलणारी मुले अशा कोर्समध्येही कोणत्याही उपक्रमात सहभाग घेत नाहीत व पालकांचे पैसे वाया जातात. अनुभवातून मिळणारे शिक्षण युवकांचा सर्वांगीण विकास होण्यास कारणीभूत ठरते. करेन तर सरकारी नोकरीच असा कोणताही दुराग्रह मनात न ठेवता पदवी मिळाल्यावर लगेच पूर्णवेळ किंवा अर्धवेळ नोकरी शोधण्यासाठी सुरुवात करावी. पहिल्या पगाराची अपेक्षा कमीतकमी ठेवावी कारण अनुभव नसल्यामुळे पहिल्या नोकरीचा उद्देश पगारापेक्षा अनुभव मिळवणे हा असतो. कोणत्याही युवकाला विचारल्यावर तो किंवा ती, पहिला पगार किती असावा यावर उत्तर देताना दरमहा 40,000 ते 50,000 या भाषेत बोलतात. त्यांना जमिनीवर आणण्याचे काम पालकच करू शकतात.
आपला मुलगा काय वाचन करतो, याकडेही पालकांचे लक्ष असावे. बऱ्याच युवकांचे वाचन शून्य झाले आहे. त्यामुळे ऐकलेल्या लेक्चरनुसार बरेच युवक परीक्षेला सामोरे जातात. एखादा विषय अवघड आहे असे सांगताच काही पालक त्याला महागड्या क्लासमध्ये पाठवतात. कोणताही क्लास लावल्यामुळे मार्क जास्त पडणार नाहीत. त्यासाठी अभ्यास करावा लागणार. परंतु ‘आपल्या मुलाला काही कमी पडू देणार नाही’ अशी प्रतिज्ञा करणारे पालक त्यांच्या पाल्याचे नुकसान करत असतात. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकांनी क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे संदर्भ ग्रंथांचे वाचन करणे आवश्यक आहे. महाविद्यालयाच्या वाचनालयाचा वापर किती विद्यार्थी करतात हा मोठा प्रश्नच आहे. एकवीस अपेक्षित प्रश्नोत्तरे वाचून अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्रातले तज्ञ होता येत नाही. त्यामुळे आपल्या मुलाकडे एकाच विषयाची किती पुस्तके आहेत आणि त्यातील किती पुस्तके त्याने घरी वाचली आहेत, हे पालकांनी बघणे आवश्यक आहे. अभ्यासामध्ये म्हणजेच वाचनामध्ये मुलाचे लक्ष लागत नसेल तर कोणत्याही मित्राची संगत न धरता थेट शांतता मिळेल अशी जागा अभ्यासासाठी शोधायला हवी आणि तिथे मोबाईल जवळपास न ठेवता सलग वाचन करायला हवे. त्यासाठी कॉम्प्युटर/मोबाईल व्यतिरिक्त कोणतीही कृती सलग एका जागेला बसून किमान दोन तास करण्याची सवय आपल्या मुलाला आहे का, याची खातरजमा सहज करता येईल.
आपला मुलगा कॉम्प्युटरवर काम करत असतो म्हणजे नेमके काय करतो? गेल्या महिन्यात तो कॉम्प्युटरवर नवीन काय शिकला? कॉम्प्युटरची आवड असल्यास त्यासंदर्भात तो काही पुस्तके वाचतो आहे का? त्यासंदर्भात काही ट्रेनिंग घेत आहे का? त्या ट्रेनिंगचा नोकरी मिळण्याशी काही संबंध आहे का? तो बराच वेळ गुगल आणि यु ट्यूब बघण्यात वेळ घालवत असेल तर त्याचा अर्थ तो कॉम्प्युटरवर काही शिक्षण घेत नाही. अलीकडे मुले कॉम्प्युटरवर ओटीटी चॅनेलवर ‘बिंज वॉच’ करून एकेक वेब सिरीज एका रात्रीत संपवतात. त्यावर बंधने न आणता त्या बघण्याला तो मुलगा दिवसभर सलग वाचनाची जोड देत आहे ना, याची खातरजमा पालकांना करता येईल. गुगलवर काहीही शोधण्याला मुले रिसर्च म्हणतात. त्यामुळे रिसर्च म्हणजे नेमके काय, हे पालकांनीच त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. कॉम्प्युटर ऑपरेट करता येणे याचा अर्थ किमान वर्ड आणि एक्सेल यावर प्रभुत्व असणे, हे कौशल्य प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे असायलाच हवे. किबोर्डकडे न बघता कोणत्याही विषयाचा एक धडा किंवा वृत्तपत्रातील अग्रलेख कमीतकमी वेळेत टाईप करता येण्यासाठी रियाज करण्याची आवश्यकता असते. अनेक युवकांकडे ते कौशल्य नसते. एक्सेल येते याचा अर्थ 100 विद्यार्थ्यांचा गेल्या तीन वर्षाच्या मार्कांचा डेटा एक्सेलमध्ये भरल्यानंतर त्यावरून किमान दहा ते पंधरा वेगवेगळे निष्कर्ष काढता यावेत. घरामध्ये लॅपटॉप असूनही गेल्या वर्षभरात आपल्या मुलाला एवढेही जमत नसेल तर तो नेमका कॉम्प्युटरवर करतो काय, हे बघायला हवे.
अर्थात आपल्या मुलावर लक्ष ठेवण्यात पालकांच्या दोन टोकाच्या पद्धती असतात. काही पालक लक्षच देत नाहीत तर काही पालक जणू मुलांच्या खोलीमध्ये सीसीटीव्ही लावलेला आहे इतका अतिरेक करतात. आपल्या मुलाचा दिवसाच्या 16 तासांपैकी किती वेळ मोबाईलवर, किती वेळ महाविद्यालयात, किती वेळ वाचनामध्ये आणि किती वेळ कुटुंबासोबत आणि घरची कामे करण्यात जातो याचा विचार पालकांनी करावा. सर्वच महाविद्यालयीन मुलांना स्वत:चा चहा, नाश्त्याचे दोन प्रकार, भात-आमटी आणि पोळी-भाजी एवढा स्वयंपाक कोणाच्याही मदतीशिवाय करता येणे गरजेचे आहे. दुसऱ्या गावी शिक्षण अथवा नोकरीसाठी वास्तव्य करावे लागल्यास या जीवन कौशल्याचा उपयोग होतो. भाजी मंडईमधून आठवड्याची भाजी कोणाच्याही सूचनेशिवाय आणणे, दरमहा लागणाऱ्या किराणा सामानाची यादी करणे, आपल्या घरच्या जमा खर्चाची पूर्ण माहिती असणे, ही अशीच जीवन कौशल्ये आहेत. आपल्या मुलाकडे किमान एक तरी कौशल्य असे असावे, जे त्याला आयुष्यभर कमाई करण्यासाठी उपयोगी पडावे. पण त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याचे बोट वेळेत सोडणे गरजेचे आहे.
-सुहास किर्लोस्कर








