ईजिप्तमधील पिरॅमिडस् हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानण्याची प्रथा आहे. ही पिरॅमिडस् त्यांचा अतिभव्य आकार, प्रचंड उंची, त्यांच्यावर असलेले अवाढव्य दगड आणि त्यांची प्राचीनता यासाठी प्रसिद्ध आहेत. हीच त्यांची जगाला माहिती असलेली ओळख आहे. पण या पिरॅमिडस्ना, त्यांच्या या इतर परिचित वैशिष्ट्यांसह एक विशिष्ट गंध किंवा वासही आहे, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. ईजिप्तमधील कैरो विद्यापीठाच्या आणि लजुब्लजाना विद्यापीठाच्या काही संशोधकांनी पिरॅमिडस्च्या या वासावर मोठे संशोधन केले आहे.
ही पिरॅमिडस् ही एक प्रकारची थडगीच आहेत. हजारो वर्षांपूर्वी त्यांच्यात त्यावेळच्या राजा महाराजांचे मृतदेह पुरलेले आहेत. त्यांना ममीज असे म्हणतात. या ममीजचा एक विशिष्ट प्रकारचा गंध या पिरॅमिडस्ना मिळालेला असून त्याचा मागोवा घेण्याचे काम या संशोधकांनी केल्याचा दावा केला जात आहे. यासाठी त्यांनी ‘गॅस क्रोमॅटोग्राफी’ नामक तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. हे संशोधन करण्यासाठी या संशोधकांनी हुंगून गंधाचे परीक्षण करण्याची क्षमता असणाऱ्या काही तज्ञांचेही साहाय्य घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. पिरॅमिडस्च्या या गंधाचे गुणवत्ता, तीव्रता आणि आल्हाददायकता अशा तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या गंधांची प्राचीनताही तपाण्यात आली असून काही पिरॅमिडस्चा गंध 5 हजार वर्षांपूर्वीपासूनचा आहे, याचा शोध लागला आहे.
पिरॅमिडस्मधील ममीजना गंध कसा मिळाला याचे कारणही स्पष्ट करण्यात आले आहे. मृतदेह पुरताना त्यातील न टिकणारे भाग काढून टाकले जात असत. तसेच त्यांच्यात विविध वनस्पतींचे चूर्ण आणि तेले यांच्यापासून बनविलेले मिश्रण भरण्यात येत असे. या मिश्रणामुळे मृतदेहांचे अस्थिपंजर प्रदीर्घ काळ टिकले आहेत. या मिश्रणाचा गंध कालांतराने पिरॅमिडच्या दगडांना आणि बाह्या आवरणांनाही मिळाला आहे. त्याचेच परीक्षण करुन पिरॅमिडस्चे परीक्षण करण्याचा प्रयत्न होत आहे.









