दहावीची परीक्षा झालेल्या मुला-मुलींच्या मनात असंख्य प्रश्न असतात. विविध शाळांमधील करियर गायडन्स व्याख्यानांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तरे
दहावीनंतर कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा?
महाविद्यालय निवडताना शक्यतो घराशेजारचे, जवळच्या परिसरातले निवडू नये. शहरामध्ये अनेक विद्यार्थ्यांना स्कूल बसने जाण्याची सवय असते. महाविद्यालयात तेवढे अंतर स्वत: पार करावे लागते. रोज किमान अर्ध्या तासाचा प्रवास करण्याची सवय लागल्यास कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची सवय लागेल. विविध शाळांनी सुरु केलेल्या ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ नये. पुढील पाच वर्षे शिकता येईल असेच महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करावा. महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजी माध्यमातच करावे. शालेय शिक्षण मातृभाषेत झालेले उत्तम परंतु महाविद्यालयात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. काही महाविद्यालयात शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले तरीही काही तथाकथित प्रोफेसर मराठीत शिकवतात, ज्यामुळे दीर्घकालीन नुकसान होते. अशा महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा मोह टाळावा. ज्या महाविद्यालयांचे संचालक त्यांच्या प्राध्यापकांना पूर्ण पगार देत नाहीत, ती महाविद्यालये उत्तम प्राध्यापकांनी सोडून दिलेली असतात. अशा महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा विचार करियरसाठी घातक. सर्वात जास्त फी असलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यामुळे स्वप्नातील करियर साध्य करता येईल, हा भ्रम आहे. अनेक महाविद्यालयांचा कॅम्पस उत्तम असतो पण त्यावरून तिथे मिळणाऱ्या शिक्षणाविषयी मत बनवू नये. काही कोचिंग क्लासेसनी कॉलेजची हजेरी लावण्याचे प्रकार सुरु केले आहेत. अशा प्रकारच्या बनावट व्यवस्थेचा भाग होऊ नये.
सायन्सला प्रवेश घेण्यासाठी किती टक्के मार्क मिळवावे लागतील?
दहावीच्या परीक्षेत कोणत्याही विद्यार्थ्याला नेहेमीपेक्षा जास्त मार्क मिळतात. त्यामुळे मिळालेल्या मार्कामधून 10 गुण वजा करावेत. दहावीमध्ये 90 टक्के मार्क पडल्यास आपला वकूब 75 ते 80 टक्क्याचा आहे, याची मनाशी खुणगाठ बांधावी. किती गुण मिळाले याप्रमाणे करियरची दिशा ठरवू नये. शालेय शिक्षणातील कोणते विषय नावडते होते याची यादी करावी. विषय नावडता असल्यास त्याचे कारण विषय आवडत नाही की शिक्षक आवडत नाहीत, याचे अवलोकन करावे. ‘सायन्स अवघड आणि आर्ट्स सगळ्यात सोपे’, ‘सायन्सला स्कोप आहे, कॉमर्सला नाही’, या गैरसमजुती आहेत. पुढील सहा वर्षे कोणत्या विषयावरील पुस्तकांचे रोज दोन तास वाचन करून सखोल अभ्यास करायला आवडेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वत:ला विचारावा. शाळेच्या पुस्तकातले सायन्स आणि अकरावीपासून पुढे शिकावे लागणारे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्राचा अभ्यासक्रम यामध्ये फरक आहे. त्यामुळे अकरावीला प्रवेश घेण्यापूर्वी अकरावी-बारावीच्या सर्व विषयांचे सिलॅबस (अभ्यासक्रम) तपशिलात बघावे. पुढील सहा वर्षात किमान दोन विषयांचा अभ्यास असा करावा की चौफेर वाचनामुळे त्यावरील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता येईल.
माझ्या आई-वडिलांची इच्छा आहे की मी डॉक्टर व्हावे. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल?
आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी करियरची दिशा ठरवू नये. ज्या विषयामध्ये सखोल अभ्यास करण्याची आवड आहे, ज्या विषयाचे क्रमिक पुस्तकांच्या पलीकडले वाचन करता येईल, असे विषय निवडावे. डॉक्टर होण्यासाठी 10 लाखांपासून 75 लाखापर्यंत खर्च येतो. एम.बी.बी.एस.साठी सर्वात जास्त खर्च करावा लागतो. तो पैसा कसा उभा करणार याचा विचार आत्ताच करावा. आठवी-नववी-दहावीची विज्ञान या विषयाचे सर्व धडे घरी स्व-अभ्यास स्वरूपात आवडीने वाचले असल्यास विज्ञान विषयाची आवड सिद्ध होते. इंग्रजी विषयावर प्रभुत्व असणे ही दुसरी महत्त्वाची अट आहे. ‘लाईट’, ‘प्राण्यांचे वर्गीकरण’, ‘प्राण्यांचे व माणसांचे प्रजोत्पादन’, ‘करोनाचे प्रकार’, ‘साथीचे रोग आणि उपाय’ अशा विषयांवर कोणत्याही तयारीशिवाय दहा मिनिटे अस्खलित इंग्रजीमध्ये कोणाहीसमोर बोलण्याची क्षमता सिद्ध करावी आणि त्यानंतर विज्ञान विषयामध्ये करियर करण्याचा निर्णय घ्यावा. बारावीनंतर मेडिकलपेक्षा पॅरा-मेडिकलमध्ये कोणते पर्याय उपलब्ध आहेत, त्या शिक्षणासाठी किती खर्च करावा लागतो,
डॉक्टर व्यवसायामध्ये कोणकोणते प्रकार आहेत? त्यासाठी किती खर्च होतो? आयुर्वेदिक डॉक्टरला काय करता येते आणि काय करता येत नाही? होमिओपॅथीचे फायदे/तोटे या विषयांचा अभ्यास विज्ञान घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनीने करावा. फिजिओथेरपीस्ट, डाएटीशियन अशा प्रकारांचा ताळेबंद मांडावा आणि स्वत:ला काय करायचे आहे ते ठरवावे. मेडिकल / पॅरा-मेडिकल / डी फार्म करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या दोन-तीन महिन्यात जवळच्या औषधाच्या दुकानात स्वयंसेवक या नात्याने (पैशाची अपेक्षा न ठेवता) काम करावे.
इंजिनियर होण्यासाठी काय करावे?
तुम्हाला सतत भन्नाट आयडिया सुचतात का? घरातील कोणतेही मशीन बंद पडले असल्यास तुम्ही चतुराईने ते दुरुस्त केले आहे का? शाळेच्या इमारतीचे चित्र चार वेगवेगळ्या कोनातून तुम्ही काढू शकता का? इंजिनियरींग करू इच्छिणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीने आपण स्वत: उत्तम ज्rदंतस् sदत्न आहोत का, याचा विचार करावा. इंजिनियरींग म्हणजे कोणत्याही समस्या कुशाग्र बुद्धीने चतुराईने सोडवणे. शास्त्रज्ञ आणि संशोधक त्यांचा ध्यास असलेल्या विषयात संशोधन करतात आणि इंजिनिअर या संशोधनाचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी करताना विज्ञान-तंत्रज्ञान आणि गणित यांचा वापर करून अभिनव डिझाईन तयार करतात. इंजिनिअर हा सर्जनशील असावा अशी अपेक्षा असते.
मला सॉफ्टवेअर इंजिनियरींगमध्ये करियर करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?
‘सॉफ्टवेअर’ मध्येच करियर का करायचे आहे? ‘इंजिनिअरींग’ मध्ये पन्नासपेक्षा अधिक प्रकार आहेत. त्यातला तुम्हाला कोणत्या विषयाचा ध्यास आहे? आमच्या मुला/मुलीला ‘सॉफ्टवेअर इंजिनियरींग’ची आवड आहे’, ‘त्यामध्येच जास्त स्कोप आहे’, ‘तिथेच जास्त पगार मिळतो’ असे अनेक गैरसमज पालकांनी करून दिले आहेत. इंजिनियरींग करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी/विद्यार्थिनीने त्यामधील किमान पन्नास प्रकारांची सविस्तर माहिती घ्यावी. सिव्हील इंजिनियरींग करू इच्छिणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी शाळेचेच चित्र चार वेगवेगळ्या कोनातून व सर्वात वरच्या मजल्यावरून काढावे आणि आपल्या समजुतीनुसार शाळेच्या इमारतीचा आराखडा तयार करावा. रसायनशास्त्राचा ध्यास असल्यास केमिकल इंजिनियरिंग, कोणतेही मशीन घरी दुरुस्त करण्याची आवड असल्यास मेकॅनिकल इंजिनियरींग, घरातील सर्व इलेक्ट्रिक दुरुस्ती आणि उघडझाप करणाऱ्या दिव्यांच्या माळा घरी करू शकल्यास इलेक्ट्रीकल इंजिनियरींग, देशोदेशी फिरण्याची आवड आणि पाण्याविषयी कोणताही प्रश्न स्वत: सोडवण्याची क्षमता असल्यास मरीन इंजिनियरींग, जीवशास्त्राची आवड असल्यास बायो-मेडिकल इंजिनियरींग, शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याची इच्छा शालेय जीवनात सिद्ध केली असल्यास अॅग्रीकल्चरल इंजिनियरींग, अशाप्रकारे आवडीच्या क्षेत्राची निवड करावी. कॉम्प्युटर ऑपरेट करण्याची आवड आहे म्हणून सॉफ्टवेअर इंजिनियरींगची निवड करू नये. कोणतेही क्षेत्र निवडले तरी प्रत्येकाला कॉम्प्युटर ऑपरेट करावा लागणारच आहे. तरीही सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची इच्छा असल्यास ‘कोडींग करायचे आहे’ ‘डेव्हलपरच व्हायचे आहे’ अशी ठराविक स्वप्ने बघण्यापेक्षा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये मिळेल तो रोल करण्याची व नवनवीन संगणक प्रणाली शिकण्याची तयारी असावी. इंजिनिअर डिप्लोमा करू की डिग्री?
दहावीनंतर डिप्लोमा करता येतो परंतु दहावीची परीक्षा झालेल्या वयात पुढील सहा वर्षे आपण इंजिनियरींगमधील पन्नास प्रकारापैकी नेमका कोणता प्रकार निवडावा याचे ज्ञान व समज नसते. डिप्लोमासाठी एखादा मार्ग निवडल्यास परतीच्या मार्गाचे दोर कापलेले असतात. त्यामुळे अकरावी-बारावीला विज्ञानाची निवड करून बारावीनंतर इंजिनियरींगबद्दल निर्णय घ्यावा.
दहावीच्या सुट्टीत क्लास लावू का?
कोणताही क्लास लावल्यामुळे कोणतेही कौशल्य येत नसते, त्याची तोंडओळख होत असते. कॉम्प्युटर ऑपरेट करणे म्हणजे इंग्रजीच्या पुस्तकातील एक धडा कीबोर्डकडे न बघता पुस्तकात बघता बघता वर्डमध्ये टाईप करता येणे, एक्सेलमध्ये पन्नास विद्यार्थ्यांच्या दहा विषयातील मार्कांचे विश्लेषण कमीतकमी वेळात करता येणे. परंतु पॉवर पॉइंटमध्ये चित्रे पेस्ट करता आल्यावर पालकाना वाटते की आपल्या मुला-मुलीला आता कॉम्प्युटर ‘चालवता’ येतो. हा गैरसमज आहे. कार कशी चालवावी याचे पुस्तकी प्रशिक्षण घेऊन कार चालवता येत नाही, त्याला रस्त्यावर सराव करण्याची जोड द्यावीच लागते.
दहावीची परीक्षा झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकांनी विचारलेल्या अन्य प्रश्नांची उत्तरे, पुढील लेखात.
सुहास किर्लोस्कर








