प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण देशामध्ये कर्नाटकातील बीजेपी सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे. 40 टक्के कमिशन दिल्यानंतरच कंत्राटदारांची बिले दिली जातात. याबद्दल राज्य कंत्राटदार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. मात्र, याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चकार शब्द बोलण्यास तयार नाहीत. काँग्रेसवर टीका करत आहेत, मात्र भ्रष्टाचारावर ते का बोलत नाहीत? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
यमकनमर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी भुतरामहट्टी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेमध्ये त्यांनी कर्नाटकमधील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार होते. मात्र, काँग्रेसचे आमदार चोरून भाजपने सरकार बनविले. त्यामुळे हे चोरीचे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पैशांची चोरी करणार, हे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांमध्ये चोरी करण्याचे रेकॉर्ड भाजप सरकारने केल्याचा आरोपदेखील यावेळी राहुल गांधी यांनी केला. 2500 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. पीएसआय भरतीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. याबद्दल पंतप्रधान मोदी काहीच बोलत नाहीत. कारण, त्यांना कर्नाटक भाजप सरकारचा भ्रष्टाचार लपवायचा आहे. एकूणच जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत असल्याचा आरोपही करण्यात आला.
आम्ही 15 लाख देणार नाही, मात्र सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करू, गृहलक्ष्मी योजना लागू करण्यात येणार आहे. आपले सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 5 महत्त्वाच्या योजना लागू केल्या जातील, असे त्यांनी सांगितले. महिलांना दोन हजार रुपये प्रतिमहिना दिले जाणार आहेत. सखी योजनेंतर्गत महिलांना मोफत बसप्रवास, अन्नभाग्य योजनेंतर्गत 10 किलो तांदूळ, गृहज्योती योजनेंतर्गत 200 युनिट मोफत वीजपुरवठा, युवानिधी अंतर्गत बेरोजगार युवकांना दोन वर्षे प्रतिमहिना 3 हजार रुपये दिले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकमध्ये काँग्रेसची लाट
कर्नाटकमध्ये काँग्रेसची लाट आहे. त्यामुळे काँग्रेसच सत्तेवर येणार, यात शंका नाही. भाजपने आजपर्यंत राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. पंतप्रधान मोदी हे 90 टक्के खोटे बोलतात. त्यांनी 2 कोटी बेरोजगारांना नोकरी देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पाळले का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांनी काम केले आहे. पाण्याचा प्रश्न संपूर्ण राज्यामध्ये गंभीर बनत चालला आहे. त्याबद्दल त्यांनी राज्याला काय दिले आहे? तेव्हा जनतेने आता त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन यावेळी केले आहे.
तरुणांनीही गांभीर्याने विचार करावा
नोटाबंदी करून काय मिळविले? उलट सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कर्नाटक राज्यातील 5 लाख युवकांना नोकरी देतो, असे सांगितले होते. मात्र, 5 हजार जणांना तरी नोकरी दिली गेली का? तेव्हा तरुणांनीही याचा गांभीर्याने विचार करावा आणि भ्रष्टाचारी सरकारचा पाडाव करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार निश्चितच क्रांतिकारी काम करणार आहे. दोन वर्षे या सरकारने राज्य योग्यप्रकारे चालविले होते. मात्र, भाजपने आमदार फोडून सरकार स्थापन केले आणि राज्याची संपूर्ण वाटच लावली, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. पेट्रोलचा दर 60 रुपये होता, तो 110 रुपयांवर पोहोचला आहे. 400 रुपयांचे सिलिंडर साडेअकराशे रुपये झाले आहे. त्याबद्दल पंतप्रधान मोदी एक चकार शब्दही बोलत नाहीत. हिम्मत असेल तर महागाईवर त्यांनी आपले मत व्यक्त करावे. महागाई आणि भ्रष्टाचार हा मुद्दा बाजूला ठेवून केवळ दुसऱ्यांवर टीका करण्यातच मोदी धन्यता मानत आहेत. मात्र, कर्नाटकातील जनता अत्यंत हुशार आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
यमकनमर्डी मतदारसंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी जो विकास केला आहे, तो विकास लक्षात ठेवा आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले. त्यानंतर तातडीने ते चिकोडीला रवाना झाले.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कर्नाटकमधील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करत आहेत तर भाजप भारत तोडो कार्यक्रमामध्ये गुंतल्याचा आरोप त्यांनी केला. संपूर्ण भाषण त्यांनी मराठीतच केले. यावेळी काही कन्नडिगांनी कन्नडमध्ये भाषण करा, असे सांगितले. मात्र, व्यासपीठावरील मान्यवरांनी मराठी समजते, त्यामुळे मराठीतच भाषण करावे, असे सांगून त्यांना मराठीतच भाषण करण्यास भाग पाडले.
यावेळी व्यासपीठावर बेळगाव उत्तरचे काँग्रेसचे उमेदवार राजू सेठ, लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार वीरकुमार पाटील, श्याम घाटगे यांच्यासह काँग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.









