ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक कॅफेमागे व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. विश्वनाथ गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून 5 कोटी रुपये किंमत असलेली व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे.
गुडलक कॅफेच्या मागे एक व्यक्ती व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित गायकवाड याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्या बॅगमध्ये हेल माशाची उलटी आढळून आली. या उलटीची किंमत 5 कोटी रुपये आहे.
भारतात उलटीला एका किलोमागे एक कोटी रुपये मिळतात तर परदेशात 4 कोटी रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो. व्हेल माशाची उलटी आणि माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणं आणि व्यापार करणं कायद्यानुसार गुन्हा आहे.









