दापोली :
दापोली कस्टम विभागाने गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिन्रायावर अत्यंत दुर्मीळ मानली जाणारी 4 किलो 140 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त केली आहे. या अंबरग्रीसची किंमत 5.45 कोटी ऊपये असल्याचे मानले जाते.
समुद्रकिनाऱ्यावर पांढऱ्या हलक्या तपकिरी रंगाचा, अत्यंत चिकट जेलीचा गोळा पडल्याची माहिती मिळाली. दापोली कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या निर्देशानुसार अधीक्षक अतुल व्ही. पोतदार आणि अधीक्षक विकास जाखर यांच्या नेतृत्वाखालील कस्टम अधिकाऱ्यांच्या पथकाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली. या पथकाने घटनास्थळी पोहोचल्यावर हा पदार्थ ’अंबरग्रीस’ किंवा ’व्हेल वोमीट’ असल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि पुढील तपास सुरू आहे. अशा पदार्थाचा बेकायदेशीरपणे वापर करताना आढळल्यास त्याच्यावर सीमाशुल्क कायदा 1962 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोतदार यांनी दिली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना लक्षात आल्यास तत्काळ 8796895990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सीमाशुल्क विभागातर्फे करण्यात आले आहे..








