13 हजार किमीचे अंतर कापत नोंदविला विक्रम
एका चांगल्या जोडीदाराचा शोध प्रत्येक जीवाला असतो. अशाच एका आकर्षक मादीच्या शोधात एक नर हंपबॅक व्हेलने प्रशांत महासागरातून हिंदी महासागरापर्यंतचा प्रवास केला आहे. त्याने तीन समुद्र ओलांडले आहेत. 13,046 किलोमीटरचे अंतर कापून सागरी प्रवासाचा विक्रम त्याने मोडला आहे.
वैज्ञानिक या नर व्हेलला अनेक वर्षांपासून ट्रॅक करत होते. याला 10 जुलै 2013 रोजी उत्तर कोलंबियन प्रशांत महासागराच्या त्रिबुगा खाडीत पाहिले गेले. यानंतर मग 13 ऑगस्ट 2017 रोजी प्रशांत महासागरात दिसला, मग 22 ऑगस्ट 2022 रोजी हिंदी महासागराच्या जंजीबार चॅनेलमध्ये हा नर व्हेल दृष्टीपथात पडला आहे. या प्रजातीचा हा सर्वाधिक अंतर कापण्याचा विक्रम आहे. या व्हेलने पृथ्वीच्या चहुबाजूला 13 हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापले आहे.
या प्रवासाचा केवळ एकच उद्देश होता. तो स्वत:साठी योग्य मादी शोधत होता. हा मासा प्रथम कोलंबियातून पूर्व दिशेने वाटचाल करत होता, मग त्याने दक्षिण सागराच्या दिशेने कूच केली. तेथे त्याने अटलांटिक महासागरात स्वत:साठी मादीचा शोध घेतला असे अध्ययन करणाऱ्या टीमचे वैज्ञानिक टेड चीसमॅन यांनी सांगितले आहे.
हिंदी महासागरात दाखल
अटलांटिकमध्ये त्याने अनेक मादी व्हेल्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात याला यश आले नाही. मग त्याने स्वत:ची दिशा बदलली. तो हिंदी महासागराच्या दिशेने सरकला. सर्वसाधारणपणे व्हेलच्या सागरी प्रवासाचा एक खास पॅटर्न असतो, व्हेल दरवर्षी उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने 8 हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करतात असे चीसमॅन यांनी सांगितले.
या नर व्हेलने नवा विक्रम नोंदविला आहे. यामुळे सागरी तज्ञांची जुनी थेअरी चुकीची ठरली आहे. यापूर्वी एक मादी हंपबॅक व्हेलने 1999-2001 दरम्यान ब्राझील ते मादागास्करपर्यंत 9800 किलोमीटरचा मोठा प्रवास केला होता. या मादी व्हेलने हा प्रवास उत्तम नर व्हेलच्या शोधात केला होता. प्रजननाच्या काळात व्हेल मासे दीर्घप्रवास करत असतात.









