सीमेवरील स्थितीचा आढावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे भारतीय सैन्याचे उत्तर कमांड आणि हरियाणाच्या चंडी मंदिर सैन्यतळावर पश्चिम कमांडचा दौरा केला आहे. सैन्याचे दोन्ही कमांड ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सक्रीय स्वरुपात सामील होते. सीडीएस चौहान यांनी दोन्ही दौऱ्यांदरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या स्थितीची समीक्षा केली. लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा आणि लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. हे अधिकारी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंमलबजावणीत सक्रीय स्वरुपात सामील होते.
सीडीएसने उत्तर आणि पश्चिम थिएटरमध्ये रणनीतिक समीक्षा देखील केली. दहशतवादी नेटवर्क निष्क्रीय करणे, दहशतवाद्यांची संपत्ती ध्वस्त करणे तसेच स्वत:च्या सैन्य सामग्री आणि नागरिकांच्या सुरक्षेकरता उचलण्यात आलेल्या पावलांविषयी सीडीएस चौहान यांना माहिती देण्यात आली. सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शत्रूच्या हल्ल्यांमुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या पूनर्वसनासाठी सैन्याने कशाप्रकारे प्रयत्न केले हे देखील त्यांना सांगण्यात आले. भारतीय सैन्याच्या क्षमता बळकट करण्यासाठी तांत्रिक नवोन्मेष, प्रगत लॉजिस्टिक क्षमता आणि रियल-टाइम सिच्युएशनल अवेयरनेसच्या भूमिकेविषयी सीडीएसना माहिती देण्यात आली. सैन्यात कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी प्रदान करण्यात येणाऱ्या वेटरन्स केयर आणि मेडिकेयर सुविधांची माहिती सीडीएसनी जाणून घेतली.
सीडीएस चौहान यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण केले आहे. सैन्याचे साहस, संकल्प आणि शिस्तीचे कौतुक केले. जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या फील्ड फॉर्मेशन्सच्या ऑपरेशनल उत्कृष्टतेचेही त्यांनी कौतुक केले. आव्हानात्मक परिस्थितींमध्ये देखील कालबद्ध पद्धतीने ऑपरेशन कार्यांची पूर्णता आणि सेवांदरम्यान ताळमेळ कौतुकास्पद होता असे म्हणत चौहान यांनी नव्याने निर्माण होणाऱ्या धोक्यांसाठी सतर्कता, संयुक्तता आणि समन्वयाच्या महत्त्वाला अधोरेखित केले आणि नागरिक पूनर्वसनात सहकार्य करण्याचे आवाहन केले.









