वृत्तसंस्था/ चेन्नई/पुडुच्चेरी
दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग आणि उत्तर विभाग संघांनी अनुक्रमे उत्तर-पूर्व तसेच पूर्व विभागाचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पश्चिम विभागाने पहिल्या डावात 123 षटकात 2 बाद 590 धावा जमविल्या. पश्चिम विभाग संघातील यशस्वी जैस्वालने 228 तर अजिंक्य रहाणेने नाबाद 207 आणि पृथ्वी शॉने 113 झळकविल्या. त्यानंतर उत्तर-पूर्व विभागाचा पहिला डाव 81.5 षटकात 235 धावात आटोपला. अंकुर मलिकने 81, थापाने 43, झिमोनेने 32 धावा जमविल्या. पश्चिम विभागातर्फे उनादकटने 35 धावात 3 तर चिंतन गजाने 38 धावात 4 गडी बाद केले. पश्चिम विभागने या सामन्यातील खेळाच्या शेवटच्या दिवशी दुसऱया डावात 64.3 षटकात 5 बाद 268 धावा जमविल्याने हा सामना अनिर्णित राहिला. मात्र, पश्चिम विभागने या सामन्यात पहिल्या डावात उत्तर-पूर्व विभाग संघावर 355 धावांची आघाडी घेतल्याने या संघाने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
पुडुच्चेरी येथे झालेल्या या स्पर्धेतील दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पूर्व विभागाने पहिल्या डावात 397 धावा जमविल्या. विराट सिंग 117 धावा झळकविल्या. त्यानंतर उत्तर विभागाने पहिल्या डावात 545 धावांचा डोंगर रचला. यश धूलने 193, ध्रुव शोरेने 81, मनदीप सिंगने 63, राणाने 62, मनन व्होराने 44 धावा जमविल्या. पूर्व विभागातर्फे शहबाज अहमदने 86 धावात 5 गडी बाद केले. पूर्व विभागने खेळाच्या शेवटच्या दिवशी दुसऱया डावात 3 बाद 102 धावा जमवित हा सामना अनिर्णित राखला. उत्तर विभागाने पहिल्या डावात पूर्व विभागावर 108 धावांची आघाडी मिळवित या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.









