वृत्तसंस्था/ लाहोर
येत्या सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी विंडीजचा महिला संघ अपात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या पात्र फेरी स्पर्धेतील अंतिम सामन्यात विंडीजने थायलंडला 166 धावांवर रोखल्यानंतर विंडीज महिला संघाला पात्रतेसाठी हे उद्दिष्ट 10 षटकात गाठणे गरजेचे होते. पण विंडीजने 10 षटकात 156 धावांपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर विंडीजने 10.5 षटकात 4 बाद 168 धावा जमवित विजय नोंदविला. दरम्यान विंडीजने 0.63 धाव सरासरी राखली. तर बांगलादेशने 0.64 धाव सरासरी राखल्याने बांगलादेश महिला क्रिकेट संघाने विंडीजला मागे टाकत आगामी विश्वचषकासाठी आपले तिकीट निश्चित केले. बांगलादेश आणि विंडीज यांनी समान 6 गुण या पात्रतेच्या स्पर्धेत मिळविले होते. आयसीसीच्या महिलांच्या वनडे मानांकनात बांगलादेशचा संघ सहाव्या स्थानावर आहे.
इसवी सन 2000 नंतर पहिल्यांदाच विंडीजचा महिला संघ आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. 2022 च्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विंडीज महिला संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण उपांत्य सामन्यात त्यांना विजेत्या ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती. विंडीजचा संघ भारतात आगामी होणाऱ्या विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत पात्र ठरु न शकल्याने या संघाची कर्णधार हिली मॅथ्यूजने नाराजी व्यक्त केली आहे. विंडीज संघामध्ये स्टिफेनी टेलर, शिमेनी कॅम्पबेल आणि फ्लेचर यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश असूनही त्यांना आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. आता 2029 पर्यंत विंडीज महिला क्रिकेट संघाला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वाट पहावी लागेल. 2025 च्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी यजमान भारत, विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, लंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या 8 संघांचा समावेश राहिल.









