वृत्तसंस्था / कराची
जानेवारी महिन्यात विंडीजचा क्रिकेट संघ पाकच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट विंडीजने 15 सदस्यांचा संघ जाहीर केला असून क्रेग ब्रेथवेटकडे नेतृत्व सोपविले आहे.
विंडीज संघातील नवोदित खेळाडू अमिर जंगूने अलिकडेच बांगलादेश विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत 83 चेंडूत नाबाद शतक (104) झळकविल्याने त्याला पाक दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. जंगूने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेत केले होते. बांगलादेश विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत गुडाकेश मोती उपलब्ध होऊ शकला नव्हता. पण त्याचे या दौऱ्यासाठी संघात पुनरागमन झाले आहे. शमार जोसेफ दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. तर या कसोटी मालिकेसाठी निवडीवेळी अल्झारी जोसेफ उपलब्ध नसल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे. विंडीज आणि पाक यांच्यातील ही दोन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत राहिल. विंडीजचा संघ तब्बल 18 वर्षांनंतर पाकचा दौरा करीत आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशीप गुणतालिकेत विंडीजचा संघ 32 गुणासह शेवटच्या स्थानावर आहे. विंडीज आणि पाक यांच्यातील पहिली कसोटी कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर 16 जानेवारीपासून तर दुसरी कसोटी मुल्तानमध्ये 24 जानेवारीपर्यंत खेळविली जाईल.
विंडीज संघ: क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जोशुआ डिसिल्वा, अॅथनेझ, कार्टी, ग्रिव्स, हॉज, इमालाच, अमिर जंगू, लुईस, मोती, फिलीप, रॉच, सिंक्लेअर, सील्स आणि जोमेल वारिकन









