वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
यजमान विंडीज आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. सदर मालिका येत्या गुरुवारपासून किंगस्टन ओव्हल मैदानावर सुरु होईल या मालिकेसाठी क्रिकेट विंडीजने संघाची घोषणा केली असून आक्रमक फलंदाज हेतमेयरचे पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघाने विंडीजच्या दौऱ्यात कसोटी मालिका 1-0 अशी नुकतीच जिंकली असून भारतीय संघ वनडे मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी 15 जणांचा विंडीज संघ जाहीर करण्यात आला. विंडीजचाआक्रमक फलंदाज शिमरॉन हेतमेयर याचे जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर पुनरागमन होत आहे. हेतमेयरने 2023 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना 13 डावात 299 धावा जमवल्या होत्या. डावखुरा फलंदाज हेतमेयर गेल्या दोन वर्षांमध्ये विंडीज संघाकडून वनडे क्रेकेटमध्ये खेळलेला नाही. हेतमेयरने आपला शेवटचा वनडे सामना 2021 च्या जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या विंडीज संघतील 15 सदस्यांकरिता चार दिवसांचे शिबिर आयोजित केले होते. उभय संघातील वनडे मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे.
किंगस्टन ओव्हलच्या मैदानावर या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने येत्या गुरुवारी आणि शनिवारी होणार असून त्यानंतर तिसरा वनडे सामना त्रिनिदादमध्ये 1 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी यष्टीरक्षक निकोलास पुरन आणि जेसन होल्डर यांनी आपण उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे विंडीज मंडळाला कळवले आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी मात्र विंडीज संघाला पात्रता सिद्ध करता आलेली नाही.
विंडीज संघ : शाय होप (कर्णधार), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), अॅथनेझ, यानिक कॅरे, कार्टी, ड्रेक्स, हेतमेयर, जोसेफ, ब्रेन्डॉन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सिलेस, शेफर्ड, सिंक्लेयर आणि थॉमस.









