रोस्टन चेसकडेच नेतृत्व : 15 सदस्यीय संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ पोर्ट ब्लेअर
2 ते 14 ऑक्टोबरदरम्यान भारत-वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. अहमदाबाद आणि दिल्ली येथे हे सामने होणार असून त्यासाठी वेस्ट इंडीजच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोस्टन चेसकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून अनुभवी क्रेग ब्रेथवेटला मात्र संघातून वगळण्यात आले आहे.
वेस्ट इंडिजचा संघ ऑक्टोबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज संघ भारताविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला सामना 2 ते 6 ऑक्टोबर आणि दुसरा 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये तर दुसरा सामना दिल्लीमध्ये खेळवण्यात येणार आहे. सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 चक्रातील हा वेस्ट इंडिजचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.
दरम्यान, रोस्टन चेसच्या नेतृत्वाखालील संघात जोमेल वॉरिकनकडे उपकर्णधारपद असणार आहे. तसेच 33 वर्षीय अष्टपैलू खेळाडू खारी पियरेचा प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, तेगनारायण चंद्रपॉल आणि अॅलिक अॅथनेझ यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुसरीकडे, 2018 च्या भारत दौऱ्यावेळी संघाचे नेतृत्व करणाऱ्या ब्रेथवेटने या वर्षी मार्चमध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये खराब फलंदाजीमुळे संघातून डच्चू देण्यात आला आहे.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी विंडीज संघ –
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), केवलन अँडरसन, अॅलिक अॅथनेझ, जॉन कॅम्पबेल, तेगनारायण चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्ह्ज, शाय होप (यष्टीरक्षक), टेविन इमलाच, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पियरे, जेडेन सील्स.









