तिसरी कसोटी : शमार जोसेफ, सेल्स, ग्रिव्हेस प्रभावी
वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरु झालेल्या दिवस-रात्रीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या लढतीतील पहिला दिवस विंडीजचा ठरला. विंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 225 धावांवर रोखले. दिवस अखेर विंडीजने 1 बाद 16 धावा जमविल्या. शमार जोसेफने 4, सेल्स आणि ग्रिव्हेस यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक पार करता आले नाही.
सदर कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत असून या मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्वॉजा आणि कोन्स्टास या सलामीच्या जोडीने सावध फलंदाजी केली. पण वेगवान खेळपट्टीचा विंडीजच्या गोलंदाजांनी चांगलाच फायदा उठविला ग्रिव्हेसने कोन्स्टासला 17 धावांवर पायचीत केले. उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 25 षटकात 1 बाद 50 धावा जमविल्या होत्या.
खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने आणखी दोन गडी गमाविताना 88 धावांची भर घातली. शमार जोसेफने ख्वॉजाला झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 23 धावा जमविल्या. कॅमेरुन ग्रीन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. सेल्सच्या इनस्विंगरवर ग्रीनचा त्रिफळा उडाला. त्याने 5 चौकारासह 46 धावा जमविल्या. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 52 षटकात 3 बाद 138 धावा जमविल्या. स्मिथ 36 तर हेड 3 धावांवर खेळत होते.
पहिल्या दिवसाच्या खेळातील शेवटच्या सत्रात विंडीजची गोलंदाजी भेदक ठरली. या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने आपले शेवटचे 7 गडी 87 धावांत गमाविले. जोसेफने स्मिथला झेलबाद केले. त्याने 8 चौकारांसह 48 धावा जमविल्या. जोसेफने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना वेबस्टरला केवळ एका धावेवर तंबूचा रस्ता दाखविला. हेडने 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. ग्रिव्हेसचा तो दुसरा बळी ठरला. अॅलेक्स कॅरेने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 20 चेंडूत 21 धावा जमविल्या. ग्रिव्हेसने त्याला हॉपकरवी झेलबाद केले. कर्णधार कमिन्सने 17 चेंडूत 3 षटकारांसह 24 धावा जमविल्या. सेल्सने त्याला झेलबाद केले. सेल्सने स्टार्कचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. शमार जोसेफने हॅजलवूडला 4 धावांवर झेलबाद करुन ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 70.3 षटकात 225 धावांवर रोखला. शमार जोसेफने 33 धावांत 4 तर सेल्सने 59 धावांत 3 तसेच ग्रिव्हेसने 56 धावांत 3 गडी बाद केले. स्टार्कची ही 100 वी कसोटी होती. पण त्याला या कसोटीत आपले खाते उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील बार्बाडोसची पहिली कसोटी 159 धावांनी तर ग्रेनेडाची दुसरी कसोटी 133 धावांनी जिंकून फ्रँक वॉरेल चषक जिंकला आहे. आता विंडीजचा संघ या मालिकेत आपला व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्न करेल.
विंडीजने दिवसअखेर 9 षटकात 1 बाद 16 धावा जमविल्या. स्टार्कने सलामीच्या अँडरसनचा 3 धावांवर त्रिफळा उडविला. किंग 8 तर कर्णधार चेस 3 धावांवर खेळत आहे. खेळाच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी 11 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव 70.3 षटकात सर्वबाद 225 (स्मिथ 48, ग्रीन 46, कमिन्स 24, कॅरे 21, ख्वॉजा 23, अवांतर 16, शमार जोसेफ 4-33, सेल्स 3-59, ग्रिव्हेस 3-56), विंडीज प. डाव 9 षटकात 1 बाद 16.









