प्रियांक पांचाळ : नाबाद 99
वृत्तसंस्था/ पुडुचेरी
सोमवारपासून येथे सुरु झालेल्या देवधर करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कर्णधार प्रियांक पांचाळच्या नाबाद 99 धावांच्या खेळीच्या जोरावर पश्चिम विभागाने विजयी सलामी देताना नॉर्थ-ईस्ट संघाचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ-ईस्ट संघाचा डाव 47 षटकात 207 धावात आटोपला. नॉर्थ-ईस्टच्या डावामध्ये अनुप अहलावतने 6, निलेश लामीचेनीने 22 जे. अँडरसनने 24, कर्णधार एल. किशेंगबामने 30 धावा जमविल्या. लेमतूरने 38 धावा जमविताना संगमा समवेत आठव्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. संगमाने 16 धावा केल्या. 47 षटकात नॉर्थ-ईस्टचा डाव 207 धावात आटोपला. लेमतूरने 1 षटकार आणि 5 चौकारांसह सर्वाधिक 38 धावा केल्या. पश्चिम विभागातर्फे नागवासवालाने 31 धावात 3 तर मुल्लानीने 37 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना पश्चिम विभागाने 25.1 षटकात 1 बाद 208 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी एकतर्फी जिंकला. गुजरातच्या कर्णधार प्रियांक पांचाळने 69 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 99 तर हार्विक देसाईने 71 चेंडूत 14 चौकारांसह 85 धावा झोडपल्या. या जोडीने 21.1 षटकात सलामीच्या गड्यासाठी 167 धावांची भागिदारी केली. नॉर्थ-ईस्टच्या लिपचाने 29 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – नॉर्थ-ईस्ट 47 षटकात सर्व बाद 207 (लेमतूर 38, अँडरसन 24, लामीचेनी 22, नागवासवाला 3-31, मुल्लानी 2-37), पश्चिम विभाग 25.1 षटकात 1 बाद 208 (प्रियांक पांचाळ नाबाद 99, हार्विक देसाई 85, लिपचा 1-29).