वृत्तसंस्था /अलूर
2023 क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर पश्चिम विभागाने मध्य विभागावर 241 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. या सामन्यात मध्य विभागाच्या शिवम मावीने 44 धावात 6 गडी बाद केले तसेच मध्य विभागाच्या पहिल्या डावामध्ये पश्चिम विभागाच्या नागवासवालाने 74 धावात 5 बळी मिळवले. या सामन्यात पश्चिम विभागाने बुधवारी खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर 8 बाद 216 धावा जमवल्या होत्या. या धावसंख्येवरून त्यांनी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे दोन गडी केवळ 4 धावांची भर घालत तंबूत परतले. पश्चिम विभागाच्या अतित सेटने 129 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारासह 74, धर्मेंद्र सिंग जडेजाने 1 षटकार आणि 3 चौकारासह 39, पृथ्वी शॉने 4 चौकारासह 26, कर्णधार पांचाळने 1 चौकारासह 13, चेतेश्वर पुजारा 3 चौकारासह 28 धावा केल्या. मध्य विभागाच्या शिवम मावीने 44 धावात 6 गडी बाद केले. आवेश खान, यश ठाकुर, सौरभ कुमार आणि सारांश जैन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
त्यानंतर पश्चिम विभागाने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मध्य विभागाचा पहिला डाव 31.3 षटकात 128 धावात गुंडाळला. मध्य विभागाच्या डावात केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. ध्रुव ज्युरेलने 55 चेंडूत 7 चौकारासह 46, रिंकू सिंगने 6 चौकारासह 48, सौरभ कुमारने 3 चौकारासह 12 धावा जमवल्या. पश्चिम विभागाच्या अरझन नागवासवालाने 74 धावात 5, सेटने 27 धावात 3 तसेच चिंतन गजाने 25 धावात 2 गडी बाद केले. पश्चिम विभागाने पहिल्या डावात मध्य विभागावर 92 धावांची आघाडी मिळवली. पश्चिम विभागाने आपल्या दुसऱ्या डावाला दमदार प्रारंभ केला. दिवसअखेर त्यांनी 39 षटकात 3 बाद 149 धावा जमवत मध्य विभागावर 241 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. पश्चिम विभागाच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने 5 चौकारासह 25, कर्णधार पांचाळने 3 चौकारासह 15 धावा जमवल्या. चेतेश्वर पुजार आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 95 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 1 षटकार आणि 8 चौकारासह 52 धावा जमवल्या. चेतेश्वर पुजारा 5 चौकारासह 50 तर सर्फराज खान 6 धावावर खेळत आहेत. मध्य विभागातर्फे सौरभ कुमारने 2 तर यश ठाकुरने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पश्चिम विभाग प. डाव 92.5 षटकात सर्वबाद 220 (अतीत सेट 74, जडेजा 39, पुजारा 28, शॉ 26, च्ंिातन गजा नाबाद 14, शिवम मावी 6-44, आवेश खान, यश ठाकुर, सौरभ कुमार, सारांश जैन प्रत्येकी एक बळी), मध्य विभाग प. डाव 31.3 षटकात सर्वबाद 128 (रिंकू सिंग 48, ध्रुव ज्युरेल 46, सौरभकुमार 12, नागवासवाला 5-74, अतित सेट 3-27, चिंतन गजा 2-25), पश्चिम विभाग दु. डाव 39 षटकात 3 बाद 149 (पृथ्वी शॉ 25, पांचाळ 15, पुजारा खेळत आहे 50, सूर्यकुमार यादव 52, सर्फराज खान खेळत आहे 6, सौरभ कुमार 2-34, यश ठाकुर 1-28).









