तृणमूल-भाजप नेत्यांमध्ये राडा : भाजप आमदारांना मार्शलनी ओढून बाहेर काढले
वृत्तसंस्था/कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी मोठा गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज सुरू असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाली. प्रकरण मारामारी आणि धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. यादरम्यान भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा वाद इतका वाढला की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना स्वत:च्या आमदारांना शांत करावे लागले. यापूर्वी, बंगाल भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना दिवसाच्या उर्वरित कामकाजासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले. प्रचंड गोंधळामुळे विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी ही कारवाई केली. या गोंधळामुळे विधानसभेला आखाड्याचे स्वरुप प्राप्त झाले होते.
विधानसभेतील कामकाजावेळी 2 सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते. याबाबत शंकर घोष यांनी सभाध्यक्षांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता शाब्दिक संघर्ष निर्माण झाला. सभाध्यक्षांनी त्यांना रोखत त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर घोष यांनी सभागृहाबाहेर पडण्यास नकार दिला. त्यानंतर असेंब्ली मार्शलना बोलवून त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांच्या असंसदीय वर्तनाचा निषेध केला. कामकाजावेळी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनीही घोषणाबाजी सुरू केल्यामुळे कामकाज अनेक वेळा तहकूब करावे लागले. सभागृहात गोंधळ वाढत गेला.
…अन् परिस्थिती चिघळली
अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बंगाली भाषा आणि बंगालींच्या अपमानाच्या विरोधात भाषण देत होत्या. त्यापूर्वी भाजप आमदार अग्निमित्र पॉल बोलणार होत्या. परंतु जेव्हा त्यांचे नाव पुकारण्यात आले तेव्हा त्या सभागृहात उपस्थित नव्हत्या. अशा परिस्थितीत सभापतींनी मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली. याचदरम्यान, अग्निमित्र पॉल आल्यानंतर भाजप आमदारांनी त्यांना बोलण्याची संधी द्यावी अशी मागणी सुरू केली. मुख्यमंत्र्यांनी सभापतींना अग्निमित्रा यांना बोलण्याची परवानगी देण्याची विनंतीही केली. सभापतींनी परवानगी दिली, पण त्यांचा बोलण्याचा वेळ कमी केला. निर्धारित वेळ संपताच त्यांचा माईक बंद करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री भाषण देण्यासाठी उभ्या राहिल्या. मुख्यमंत्र्यांनी बंगाली भाषेवरील हल्ल्याबद्दल बोलायला सुरुवात करताच, शंकर घोष घोषणाबाजी करू लागले. ते शुभेंदु अधिकारी यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित करत राहिले आणि त्यांच्यावर वेगवेगळी विधाने केली जात असल्याचा आरोप करत राहिले. सभापतींनी त्यांना अनेक वेळा इशारा दिला, पण घोष यांनी ऐकले नाही. अखेर मुख्यमंत्र्यांना त्यांचे भाषण मध्येच थांबवावे लागले. यानंतर, सभापतींनी शंकर घोष यांना निलंबित केले. पण घोष त्यांच्या जागेवरून हलण्यास तयार नव्हते. भाजप आमदारांनी त्यांना घेरले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे सभागृहात जोरदार हाणामारी आणि धक्काबुक्की झाली. अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वत: वेलमध्ये जात तृणमूल पक्षाच्या आमदारांना त्यांच्या संबंधित जागांवर बसण्याचे निर्देश दिले.
ममता प्रशासनाकडून लोकशाहीची हत्या : शुभेंदू अधिकारी
या गोंधळावर प्रतिक्रिया देताना बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘ममतांनी आज पश्चिम बंगाल विधानसभेत आपल्या गुलाम प्रशासनाच्या साथीने लोकशाहीची हत्या केली आहे’, असे ट्विट त्यांनी केले.









