मुख्यमंत्र्यांच्या विरोधानंतरही दिली भेट : पीडितांशी संवाद साधून केंद्राला पाठवणार अहवाल
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस शुक्रवारी मालदा येथे पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची विनंती नाकारत हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केल्याने मुख्यमंत्री-राज्यपाल संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी त्यांना दंगलग्रस्त भागांचा दौरा पुढे ढकलण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी रेल्वेने मालदा येथे जात हिंसाचारग्रस्त लोकांशी थेट संवाद साधला. आता लवकरच राज्यपाल आपल्या पाहणीतील निष्कर्ष आणि मालदामधील सद्यस्थितीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवणार आहेत. दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही मालदा जिह्यात एक पथक पाठवले आहे. हे पथक हिंसाचारानंतर मुर्शिदाबादहून पळून गेलेल्या लोकांना भेटून त्यांची चौकशी करणार आहे.
राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस मुर्शिदाबाद जिह्यात अलिकडेच झालेल्या जातीय हिंसाचारातील पीडितांना भेटण्याची योजना आखत होते. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना सध्या त्या भागात न जाण्याची विनंती केली होती. येथील हिंसाचारानंतर अनेक लोक आपली घरे सोडून पळून गेले असून त्यांनी नजिकच्या जिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला आहे. राज्यपालांनी शुक्रवारी येथील पीडितांना भेटून एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला.
दौऱ्यापूर्वी माध्यमांशी संवाद
राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी मालदा येथे रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. मी पीडितांना भेटून वास्तव जाणून घेणार आहे. मला मिळालेल्या माहितीची पडताळणी करेन. मी रुग्णालये, पीडितांची घरे आणि मदत शिबिरांना भेट देईन, असे ते म्हणाले. सध्या केंद्रीय दल आणि राज्य पोलीस एकत्र काम करत आहेत. लवकरच परिस्थिती सामान्य होईल. पीडितांना भेटल्यानंतर मी माझ्या शिफारसी पेंद्राला पाठवीन, असेही त्यांनी सांगितले.
मानवाधिकार आयोगाची टीमही दाखल
मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) पथक सध्या मालदा जिह्यात तळ ठोकून आहे. विस्थापित रहिवाशांना भेटणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. हिंसाचारानंतर तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हे पथक हिंसाचाराची कारणे आणि त्याचा परिणाम तपासेल. ते पीडितांचे जबाब नोंदवतील आणि आपला अहवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला सादर करतील.









