वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या शासकीय आणि अनुदानप्राप्त विद्यालयांमध्ये 25,753 शिक्षक आणि बिगरशिक्षक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला अमान्य ठरविणाऱ्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकार तसेच इतरांच्या याचिकेवर सप्टेंबरमध्ये सुनावणी केली जाणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सांगितले. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या याचिकांवर 16 ऑगस्टपर्यंत भूमिका मांडण्याची मुदत पक्षकारांना दिली आहे.
पश्चिम बंगालच्या प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्यांसाठी लेखी युक्तिवाद दाखल करण्याचा कालावधी पुढील शुक्रवारपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. या खंडपीठात न्यायाधीश जे.बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या 22 एप्रिल रोजीच्या निर्णयाशी संबंधित 33 याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आता सप्टेंबरमध्ये अंतिम सुनावणी करणार आहे.









