सर्वेच्च न्यायालयाचा आदेश
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील भाजप नेते कबीर शंकर बोस यांच्यावर नोंद एफआयआर सीबीआयकडे हस्तांतरित केला आहे. 6 डिसेंबर 2020 रोजी हुगळीत नोंद 2 एफआयआरमध्ये कबीर समवेत अनेक भाजप नेत्यांवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण आणि महिलांशी गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता.
आपले पूर्वाश्रमीचे सासरे तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी वैयक्तिक सूडापोटी या प्रकरणात माझे नाव गोवले असल्याचा आरोप कबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत केला होता. याप्रकरणी कबीर यांना सुरक्षा प्रदान करणाऱ्या सीआयएसएफने न्यायालयात त्यांची मूव्हमेंट लॉग शीट सादर केली होती. यातून कबीर हे घटनास्थळी उपस्थित नव्हते हे स्पष्ट झाले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणातील कारवाईला स्थगिती दिली होती.
याप्रकरणी पोलिसांनी वस्तुस्थितीची खरी पडताळणी केली नाही. कबीर बोस हे राज्यातील सत्तारुढ पक्षाचे विरोधक असल्याने त्यांना नुकसान होण्याची भीती आहे. याचमुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविणे योग्य ठरेल असे न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना आणि पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. कबीर यांनी भाजपच्या तिकीटावर श्रीरामपूर मतदारसंघात कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.









