वृत्तसंस्था/सेंट लुईस, अमेरिका
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने सिंकफिल्ड कपमध्ये उपविजेता बनून ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले, तर अमेरिकन वेस्ली सोने नाट्यामय प्लेऑफ विजयासह विजेतेपद पटकावले. सो याने नवव्या आणि शेवटच्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हला हरवले आणि प्रज्ञानंद व फॅबियानो काऊआना यांच्याशी 5.5 गुणांसह बरोबरी केली. त्यानंतर तो प्ले-ऑफमध्ये जाऊन संभाव्य दोनपैकी 1.5 गुण त्याने कमावले. प्रज्ञानंदने अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनशी बरोबरी साधली आणि नंतर टायब्रेकरमध्ये काऊआनाला हरवून एका गुणासह दुसरे स्थान मिळवले. टायब्रेकरनंतर कारुआनाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले, जिथे त्याने सोविऊद्ध एकमेव बरोबरी नोंदविली. ग्रँड चेस टूरसाठी फ्रान्सचा मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह हा आधीच सर्वाधिक गुण मिळविलेला खेळाडू असल्याने पात्र ठरलेला असून लेव्हॉन अॅरोनियननेही काऊआना आणि प्रज्ञानंदसह जीसीटी ग्रँड फिनालेसाठी पात्रता मिळवली आहे.
क्लासिकल विभागात, सो, काऊआना आणि प्रज्ञानंद यांनी प्रत्येकी 5.5 गुणांसह समान अव्वल स्थान पटकावले, तर अॅरोनियन नऊ सामन्यांतून 5 गुणांसह एकट्याने चौथ्या स्थानावर राहिला. वाचियर-लाग्रेव्ह, अमेरिकेचा सॅम्युअल सेव्हियन आणि पोलंडचा दुडा जान-क्रिजस्टोफ यांनी प्रत्येकी 4.5 गुणांसह पाचवे स्थान पटकावले. जागतिक विजेता डी. गुकेशपेक्षा ते अर्ध्या गुणाने पुढे राहिले. गुकेशच्या हातून चांगली कामगिरी या स्पर्धेत घडलेली नाही. फ्रान्सचा अलिरेझा फिरोजा 3.5 गुणांसह नवव्या स्थानावर राहिला, तर अब्दुसत्तोरोव्ह एकूण 2.5 गुणांसह शेवटच्या स्थानावर राहिला.
पहिल्या टायब्रेकर गेममध्ये काऊआनाविऊद्ध जलद विजय मिळवून प्रज्ञानंदने चषक जिंकण्याचे स्वप्न उंचावले होते. तथापि, दुसऱ्या फेरीत भारतीय खेळाडू सोविऊद्ध पराभूत झाला आणि अमेरिकन खेळाडूने अंतिम सामन्यात काऊआनाला रोखून स्पर्धा जिंकली. त्यापूर्वी प्रज्ञानंदने आरोनियनकडील सामना सहज बरोबरीत सोडविला आणि आघाडीच्या तीन खेळाडूंमध्ये आपले स्थान निश्चित केले. त्याने कदाचित ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले आणि पांढऱ्या सोंगाट्यांसह अतिशय सावधगिरीने खेळ खेळला.
दुसरीकडे, शेवटच्या फेरीत इटालियन ओपनिंगमध्ये गुकेशने काऊआनाशी बरोबरी साधली. काऊआनाने पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळत असतानाही त्याच्यापुढे फारशा समस्या निर्माण केल्या नाहीत. शेवटी हा सामना बरोबरीत सुटला. आता साऱ्या घडमोडी उझबेकिस्तानमध्ये घडतील, जिथे ग्रँड स्विस स्पर्धा 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत जगातील बहुतेक अव्वल खेळाडू सहभागी होऊन आघाडीच्या दोन खेळाडूंत स्थान मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस लागेल. आघाडीचे दोन बुद्धिबळपटू पुढील कँडिडेट्स स्पर्धेतील स्थान निश्चित करतील. कँडिडेट्समधून पुढील जागतिक अजिंक्यपद लढतीतील गुकेशचा आव्हानवीर ठरेल. प्रज्ञानंद हा आतापर्यंत कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरलेला एकमेव भारतीय आहे.









