ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात महागाई, पुरस्थिती, ओला दुष्काळ, ईडीच्या कारवाईविरोधात विरोधकांनी बुधवारी अधिवेशनापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे – फडणवीस सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) विधानभवनात दाखल होताच विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओक्के, आले रे आले गद्दार आले’ अशा तुफान घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईडीच्या कारवाईविरोधातही विरोधकांनी ईडी सरकार हाय हाय…, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो, धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला होता. त्यावरून बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिल आहे.
“आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का?” असा सवाल बच्चू कडूंनी विरोधकांना केला आहे. “तुम्हाला जर प्रत्येक आमदाराला किती खोकी दिली याबाबत माहिती होती तर तुम्ही अडवायचं होत. आम्हाला थांबवायचं होतं. विरोधक अशा प्रकारचे आरोप करतच असतात त्याला काहीही अर्थ नसतो”, असे वक्तव्य बच्चू कडूंनी केले आहे.
हे ही वाचा : ५० खोके, एकदम ओके; मुख्यमंत्री शिंदेंसमोर विरोधकांची घोषणाबाजी
फोन टॅपिंग प्रकरणाशी माझा संबंध नाही
फोन टॅपिंगप्रकरणी बच्चू कडू यांचं नाव पुढे येत आहे. याप्रकरणीही त्यांनी खुलासा केला. “माझा फोन टॅप करण्यात आला होता. मात्र, हे सगळ चुकीचं आहे. फोन टॅपिंग प्रकरणाशी माझा संबंध नाही. नेत्याचा फोन टॅप करणं हा नालायकपणा आहे. दरम्यान, या प्रकरणात मला कोणत्याही अधिकाऱ्याच्या, पक्षाच्या क्लिनचीटची गरज नाही. अशी वेळ या बच्चू कडूवर येणार नाही. काही केले असेल तर सिद्ध करावे. त्यासाठी कोणाच्या पाया पडायची गरज नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.