धोका ओळखा अन् पाणी जपून वापरा : महिन्याभरात पाण्याची भीषण टंचाईची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
पाण्याची होत असलेली नासाडी लक्षात घेता येत्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात निर्माण होईल, यात शंका नाही. मात्र, वेळ अजूनही गेलेली नाही. पाणी जपून वापरल्यास पुढील काळात फायदाच होणार आहे. सध्या शहर व तालुक्यातील अनेक विहिरींनी तळ गाठण्यास सुऊवात केली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरल्यास सोयीचे ठरणार आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून पावसाने बऱ्यापैकी साथ दिली आहे. पावसाने अनेक ठिकाणी पुराचा फटका बसला आहे. मात्र, अजूनही पाण्याचे दुर्भिक्ष संपत नाही. परिणामी विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. शहरात अनेक नागरिकांच्या विहिरी आहेत. सार्वजनिक विहिरीही आहेत. परंतु शहरातील अनेक भागातील सर्रास विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे पाणीपुरवठा विभागाकडून आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागत आहे.
पाऊस झाला असला तरी पाण्याचे नियोजन न केल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून आठवड्यातून फक्त एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरींनीही तळ गाठल्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेकांनी सध्या विहिरींमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतल्याचे दिसून येत आहे. बेळगाव परिसरात पाण्याची पातळी चांगली असते. त्यामुळे परिसरातील विहिरींमध्ये चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध होते. मात्र, मागील 10-12 वर्षांत फटका बसत आहे. त्यामुळे विहिरींमधील पाणी पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर आहे. अनेक अपार्टमेंटमध्ये एकच विहीर खोदून पाणीपुरवठा केला जातो. परंतु या विहिरींमधीलही पाणी कमी झाल्याने अर्पाटमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आठवड्यातून एकदा येणाऱ्या पाण्यावरच अलंबून राहण्याची वेळ आली आहे. आपल्या भागात चांगल्या प्रकारे पाणीपुरवठा करावा यासाठी सातत्याने विविध भागातील नागरिक पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अधिक प्रमाणात पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊनही आपल्या भागात पाणी कमी आले पेंवा आलेच नाही, अशा तक्रारी होत आहेत.
शहरातील काही भागात तलाव आहेत. पण तलावांना जलपर्णीने विळखा दिला आहे. गाळही वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांना पाण्याची समस्या निर्माण होत आहे. याकरिता तलावांची स्वच्छता करून हे तलाव शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. शहरात असणारे तलाव नागरिकांना व शेतकऱ्यांना सोयीचे होत होते. शहरात आजही अनेक शेतकरी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत. शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्याबरोबरच जनावरांना सोडण्यासाठी हे तलाव उपयोगी पडत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून लघु पाटबंधारे विभागाचे या तलावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच ड्रेनेजचे पाणी या तलावांमध्ये मिसळत असल्याने व अनेक नागरिक या तलावांमध्ये कचरा टाकत असल्याने हे तलाव सध्या बिनकामाचे बनले आहेत.
वडगाव, अनगोळ, खासबाग, जुनेबेळगाव आदी भागात तलाव आहेत. परंतु हे तलाव शेतकऱ्यांच्या कामाचे नसल्याचे दिसून येत आहे. अनेकदा मागणी करूनदेखील या तलावांच्या दुऊस्तीकडे मनपा, लघु पाटबंधारे विभाग यांचे दुर्लक्ष झाले आहे. अजूनही अनेक तलावांची अवस्था गंभीर बनत आहे. त्याला उद्योग खात्रीची जोड दिल्यास तलावांची स्वच्छता होईल. पण तसे होत नाही. त्यामुळे आता तलावांमध्येही जलपर्णी आणि गाळ वाढल्याने समस्या गंभीरच बनत चालली आहे. विहिरी व तलावांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे गाळ काढून विहीर व तलाव स्वच्छ करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. परंतु अनेकजण विहिरींमधील गाळ काढण्यासाठी मोठी रक्कम घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनाही विहिरींची दुऊस्ती करताना त्रास सहन करावा लागत आहे. कारण प्रतिफुटाप्रमाणे स्वच्छतेसाठी दर आकारण्यात येत आहे. गाळ काढणाऱ्या कामगारांची संख्या कमी असल्याने हे कामगार शोधून आणण्यासाठीही नागरिकांना प्रयत्न करावे लागत आहेत.
ड्रेनेज पाण्याचे काय?
शहरातील बहुतांश विहिरींमध्ये आता ड्रेनेजमिश्रित पाणी आहे. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. परिणामी जर पाणी ड्रेनेजम़िश्रित होण्यापासून वाचवले तर ते अनेकांना उपयोगी ठरू शकते. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच अनेक ठिकाणी ड्रेनेजमिश्रित पाणी नळांना येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ही समस्याही आता डोके वर काढत असून येत्या काळात नागरिकांना मोठा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









