ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने समस्या : मनपाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी/ बेळगाव
दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढते आहे आणि तसतसे पाण्याचे दुर्भिक्ष्यही वाढत आहे. अशावेळी अतिशय उपयुक्त ठरते ते विहिरांचे पाणी. परंतु सध्या या विहिरींचे पाणी पूर्णत: दूषित झाल्याने पाणी असूनही त्याचा उपयोग करता येत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
शहापूर परिसरात प्रामुख्याने कचेरी गल्ली, कोरे गल्ली आणि इतर अनेक ठिकाणी असणारे विहिरींचे पाणी ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने दूषित झाले आहे. दरवर्षी ही समस्या उद्भवत असून नागरिकांनी यासंदर्भात मनपाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
मुळात विहिरींच्या बाजूने किंवा विहिरीमधूनच ड्रेनेज पाईपलाईन देणे हे चुकीचे आहे. परंतु नियम न पाळता हे प्रकार केल्याने शहापूर परिसरातील पिण्याच्या पाण्यायोग्य असलेल्या विहिरी पूर्णत: दूषित झाल्या आहेत. विहिरींचे पाणी दूषित झाल्याचा अंदाज न आल्याने ज्या कुटुंबांमध्ये या पाण्याचा वापर झाला, त्या कुटुंबातील बहुसंख्य सदस्य आजारी पडले आहेत.
सातत्याने गल्लीतील अनेक कुटुंबांमध्ये आजार उद्भवू लागल्याने पाण्याच्या बाबतीत तपासणी केली. तेव्हा हे पाणी पूर्णपणे दूषित झाल्याचे आढळून आले. पाण्याला दुर्गंधीसुद्धा येत आहे. त्यामुळे आता ऐन उन्हाळ्यात लोकांना पिण्याचे पाणीसुद्धा विकत घेण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाईवर विहिरींचे पाणी हा मोठा अत्यंत महत्त्वाचा उपाय होऊ शकतो. परंतु जोपर्यंत या विहिरींची स्वच्छता करता येत नाही, तोपर्यंत त्याचे पाणी वापरता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन निवारण करावे व नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.









