पंतप्रधान मोदींचे वक्तव्य ः भारताला विकसित देश करण्यात महत्त्वाची भूमिका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताला विकसित देशाचा दर्जा मिळवून देण्यात शहरांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. यातही भविष्याच्या गरजा विचारात घेत नियोजनपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या शहरांचे मोठे योगदान राहणार आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देशाचा मान मिळवून देण्यासाठी अमृतकाळ म्हणजेच पुढील 25वर्षे पूर्ण महत्त्वपूर्ण आहेत आणि यात आमच्या शहरांची मोठी भूमिका राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे ‘अर्बन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट अँड सॅनिटेशन’ विषयावरील वेबिनारमध्ये सामील झाले.
अमृतकाळात शहरी नियोजनाद्वारेच आमच्या शहरांचे भाग्य निश्चित होणार आहे. तर सुनियोजित शहरेच भारताचे भाग्य निर्धारित करतील. नियोजन उत्तम असेल तरच देशातील शहरांना बदलत्या हवामानाचा मुकाबला करण्यास सक्षम करता येईल. पूर्ण नियोजनासह शहरांच्या विकासावर काम करण्यात यावे असे पंतप्रधानांनी राज्यांना उद्देशून म्हटले आहे.
भारतात शहरांच्या विकासाशी संबंधित दोन महत्त्वाचे पैलू आहेत. नव्या शहरांचा विकास आणि जुनया शहरांमध्ये जुन्या व्यवस्थांना आधुनिक काळानुसार विकसित करणे हे दोन पैलू आहेत. हा दृष्टीकोन समोर ठेवून केंद्र सरकारने अर्थसंकल्पात शहरी विकासाला मोठे महत्त्व दिले आहे. 2023-24 च्या अर्थसंकल्पात शहरी नियोजनासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.
नियोजन अन् प्रशासन महत्त्वपूर्ण
शहरी विकासासाठी शहरी नियोजन आणि शहरी प्रशासन दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. शहरांचे खराब नियोजन आणि त्यानंतर योग्य पद्धतीने ते लागू न करण्यात आल्याने उद्भवणाऱया आव्हानांवरून पंतप्रधानांनी सतर्क केले आहे. शहरी नियोजनाच्या अंतर्गत परिवहन, मूलभूत सुविधा, जलव्यवस्थापन यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमप्रकारे योजना तयार करूनच नव्या शहराचा विकास व्हायला हवा असे पंतप्रधान म्हणाले.
परिवहन व्यवस्था मजबूत करावी
कुठल्याही शहरासाठी त्याची परिवहन यंत्रणा महत्त्वपूर्ण स्तंभ असते. देशातील शहरांमध्ये अडथळेरहित परिवहनाची सुविधा असावी. मेट्रो नेटवर्कसह रस्त्यांचे रुंदीकरण, ग्रीन मोबिलिटी आणि एलेवेटेड रोडला कुठल्याही शहराच्या सुनियोजित विकासाशी निगडित योजनेत सामील करण्यावर भर द्यावा अशी सूचना त्यांनी केली आहे.
भविष्यातील शहरांची नवी व्याख्या
भारताला 2047 पर्यंत विकसित देशाचा मान मिळवून द्यायचा असेल तर भविष्यातील शहरांसाठी नवी व्याख्या तयार करत नवे मापदंड निश्चित करावे लागतील. शहरी नियोजनात मुलांसाठीच्या सुविधा विचारात घेण्यात याव्यात. मुलांसाठी क्रीडा मैदानापासून सायकल ट्रक निर्माण केले जावेत. नवी शहरे कचरामुक्त असावीत, पाणीपुरवठय़ाचे नियोजन अन् हवामान अनुकूल असावीत. टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये शहरी पायाभूत विकास आणि नियोजनात गुंतवणूक वाढली तरच हे शक्य होणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.









