जी-20 शेरपाचे सर्वच स्तरांमधून कौतुक
नवी दिल्लीतील जी-20 परिषदेच्या घोषणापत्राबद्दल सहमती निर्माण करण्याचे शिवधनुष्य भारताने पेलले आहे. जी-20 घोषणापत्रावर सहमती निर्माण करणे सोपे नव्हते. परंतु भारताने सर्व सदस्य देशांमध्ये मतैक्य निर्माण करत जागतिक समुदायाला आश्चर्याचा धक्का दिला. जी-20 परिषदेचे यश पाहून काँग्रेस खासदार शशी थरूर भारावून गेले आहेत. त्यांनी जी-20 शेरपा अमिताभ कांत यांचे कौतुक केले आहे. ‘वेल डन! अमिताभ कांत’ हा सर्वांसाठी गौरवशाली क्षण असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे. जी-20 घोषणापत्रावर जागतिक नेत्यांमध्ये सहमती निर्माण करण्याचे श्रेय थरूर यांनी अमिताभ कांत यांना दिले. कांत यांनी आयएएसऐवजी आयएफएस होणे निवडले असते तर देशाला एक असाधारण मुत्सद्दी मिळाला असता, असे गौरवोद्गार थरूर यांनी काढले आहेत.
शिक्षण-आरोग्य क्षेत्रात भारताचे ‘व्हिजन’

संयुक्त घोषणापत्रात शिक्षण-आरोग्याच्या क्षेत्रात भारताच्या व्हिजनला स्थान देण्यात आले आहे. तसेच भारताचे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या केंद्रस्थानी शिक्षण अन् कौशल्यविकासाच्या उद्दिष्टाचे समर्थन करण्यात आले आहे.कुठल्याही महामारीला सामोरे जाण्यासाठीच्या तयारींसाठी आरोग्य सेवेला मजबूत करण्याच्या दिशेने शक्य ती सर्व पावले उचलावीत असे नमूद करण्यात आले आहे. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज प्राप्त करणे आणि आरोग्य आणीबाणीचा मुकाबला करण्यासाठी भारताच्या व्हिजनला स्वीकारण्यात आले आहे.
वन हेल्थ जॉइंट प्लॅन ऑफ अॅक्शन (2022-26) देखील घोषणापत्राचा खास हिस्सा आहे. भविष्यात कुठलीही आरोग्य आपत्ती उद्भवल्यास सर्व देश अॅक्शन प्लॅन अंतर्गत वाटचाल करणार आहेत. घोषणापत्रात शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
हेल्थ फायनान्स मोठा घटक
जॉइंट फायनान्स अँड हेल्थ टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. टास्क फोर्सच्या बैठकांमध्ये कमी उत्पन्नगटाच्या देशांचा आवाज मांडला जाणार आहे. पुढील काही वर्षांमध्ये प्रत्येक देशाची आरोग्य सुविधा सुधारण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.









