राज्यभरात निघाल्या शोभायात्रा : मंदिरांमध्ये ब्रह्मध्वज पूजन, दिंड्या

पणजी : राज्यात बुधवारी सर्वत्र नववर्ष अर्थात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक ऊढीपरंपरेनुसार भक्तीभावाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त राज्यभरात अनेक धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बहुतेक ठिकाणी हिंदू नववर्ष स्वागत समित्यांतर्फे ढोल ताश्यांच्या गजरात शोभायात्रा, दिंडी पथके आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात भारतीय संस्कृतीप्रेमी शेकडो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा, भगवे झेंडे आदींसह भाग घेतला. त्याशिवाय राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सेवाभावी संस्था, अशा विविध स्तरांवरील नागरिक, विद्यार्थी यांचीही मोठी उपस्थिती लाभली होती. पहाटे 6 वाजता या शोभायात्रा प्रारंभ झाल्या. पणजी, सांखळी, वास्को, म्हापसा, फोंडा, आदी राज्यातील बहुतेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात फेरी मारल्यानंतर निर्धारित ठिकाणी ब्रह्मध्वजाचे विधीवत पूजन करण्यात आले. सर्वांना कडुनिंबाची पाने वा चटणी तसेच मिठाई वाटण्यात आली. सर्वांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय अशा शुभेच्छा संदेशांनी काल दिवसभर वॉटस्अॅप, ट्विटर, फेसबूक, टेलेग्राम, यासारखी समाजमाध्यमे अक्षरश: ओव्हरफ्लो झाल्याचेही दिसून आले. प्रत्येकाने स्वत:च्या घरी दाराला तोरण बांधून व दारात गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नवीन पंचागांचीही पूजा करण्यात आली. पाडवा हा पवित्रातील पवित्र अशा साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नव्या खरेदीलाही उधाण आले होते. अनेकांनी सोने, वाहने, नवीन फ्लॅट यांची खरेदी केली. गृहप्रवेश करण्यात आले.









