प्रतिनिधी /मडगाव
लोककेंद्रीत विकास आणि दुरुस्त्या व्हाव्यात याकडे नवनिर्वाचित आमदार म्हणून आपला कल राहणार असून आमच्या आंदोलनानंतर नगरनियोजनमंत्र्यांनी जनविरोधी दुरुस्त्या रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे आपण स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया आपचे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी दिली आहे.
रेन्बो वॉरियर्ससह अभिजित प्रभुदेसाई, डायना, क्लाऊड आल्वारीस, विविध बिगरसरकारी संघटना आणि गोमंतकीय जनतेचे त्यांनी अभिनंदन केले आहे. मागील एका महिन्यात आम्ही जनतेला या दुरुस्त्या कशा गोव्यासाठी घातक आहेत ते पटवून देण्यात यशस्वी ठरलो. तसेच नगरनियोजनमंत्र्यांशी बोलताना वेळोवेळी आपण त्यांना याच्या विपरित परिणामांची जाणीव करून दिली होती. एकंदर दबावामुळे त्यांना या दुरुस्त्या रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असे आमदार व्हिएगस यांनी सांगितले.
बदल हा आहे. नवनिर्वाचित आमदारांनी आपली भूमिका पार पाडली. परंतु लढाई अजूनही जिंकलेली नाही. अजूनही कित्येक अशा दुरुस्त्या आहेत ज्या रद्द होण्याची गरज आहे. त्यासाठी एकेक पाऊल पुढे टाकत लढाई लढायची आहे. त्यासाठी गोमंतकीय जनतेची साथ आम्हाला हवी, असे ते पुढे म्हणाले.









