चायनीज लाईट्सची चलती, देशी लाईटलाही मागणी अधिक
प्रतिनिधी /बेळगाव
गणराया अकरा दिवस घरामध्ये विराजमान होणार असल्याने आगमनाची जय्यत तयारी केली जात आहे. यावषी रंगीबेरंगी दिव्यांनी गणरायाचे स्वागत केले जाणार आहे. चायनीज लाईट्स मोठय़ा प्रमाणात दाखल झाले असून त्यांचीच जास्त प्रमाणात चलती असल्याचे दिसून येत आहे. दर अधिक असले तरी किफायतशीर असणाऱया देशी लाईट्सला गणेशभक्तांकडून पसंती मिळत आहे. एकूणच दिव्यांच्या माळा, फोकस, हॅलोजन, पाण्याचे फवारे खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे.
गणरायाची आरास करण्यासाठी विद्युत माळा, दिवे, झुंबर, फोकस, एलईडी लाईट वापरले जातात. मागील काही वर्षापासून विविध प्रकारचे व विविध आकारांमधील विद्युत दिवे विक्रीसाठी येत आहेत. यावषी ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध रंगांच्या एलईडी लाईट विक्रीसाठी ठेवले आहेत. बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये विद्युत दिव्यांची विक्री करण्यात येत आहे. चिनी माल कोरिया येथून भारतात दाखल होत असल्यामुळे यावषी बाजारात चिनी वस्तूंचा दबदबा दिसत आहे.
यावषी इंधनाच्या दरवाढीमुळे वाहतुकीचे दर वाढले आहेत. याचा फटका देशी लाईट्सला बसू लागला आहे. त्यांच्या दरात 50 ते 75 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला काही प्रमाणात कात्री लागणार आहे. देशी लायटिंगच्या माळा 280 रुपयांपासून बाराशे रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर चिनी साहित्यात पारकेन लाईट्स 250 ते 4500 रुपये, एलईडी स्ट्रीप 25 रुपयांपासून पुढे, झुंबर 80 ते 800 रुपये, लहान माळा 100 ते 300 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत.
देशी लायटिंग माळांना मागणी
बेळगावमध्ये अनेकजण घरीच लायटिंगच्या माळा विणतात. यामध्ये चार प्रकार असून एक रंगीबेरंगी, दुसरा एकाच रंगाचा तर एसी व डीसी बल्बच्या माळा असतात. पहिले दोन प्रकार घरगुती वापरासाठी असतात. तरी शेवटचे दोन प्रकार डेकोरेटर्स वापरतात. कोणत्याही प्रकारे मशीनचा वापर न करता हाताने या माळा तयार करण्यात येतात. यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या माळा अधिक काळ टिकत असून त्यांची दुरूस्ती होत असल्याने देशी लायटिंगच्या माळांना अधिक मागणी आहे.
चायनीजच्या किंमती कमी
बेळगाव ही मोठी व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आसपासच्या 150 ते 200 किमीवरून ग्राहक बेळगावमध्ये येत असतात. यावषी मोठय़ा प्रमाणात चिनी बनावटीचा माल बेळगावमध्ये दाखल झाला आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत या वषी मोठय़ा प्रमाणात चिनी साहित्य उपलब्ध झाले आहे. चिनी बनावटीच्या किमतीत यावषी घट झाली असल्याने ग्राहक या साहित्याला पसंती देत आहेत. त्यामुळे भारतीय बनावटीच्या साहित्याला चिनी साहित्याशी स्पर्धा करावी लागत आहे.









