अनगोळ परिसरातील प्रकार
बेळगाव : शहरातील अर्धवट विकासकामांचा फटका मंगळवारी गणेशभक्तांना बसला. निसरड्या व चिखलमय रस्त्यामधून लाडक्या बाप्पाला घरी आणावे लागले. यामध्ये काही भाविक घसरून पडण्याचे प्रकारही घडले. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा गणेशभक्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याने संताप व्यक्त होत होता. अनगोळ परिसरात ड्रेनेज व जलवाहिन्या घालण्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. या चरीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात माती टाकण्यात आली. परंतु जुलै महिन्यात झालेल्या पावसामध्ये ही माती खचली. त्यावेळी बरीच टीका झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा माती आणून टाकण्यात आली. परंतु मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा हा रस्ता चिखलमय झाला आहे. अनगोळमधील राजहंस गल्ली ते वडगाव रोड या दरम्यानचा रस्ता चिखलमय झाला आहे. अशा निसरड्या रस्त्यामधूनच मंगळवारी भाविकांना गणेशमूर्ती घरी आणाव्या लागल्या. चिखलातून वाट काढत गणेशमूर्ती आणाव्या लागल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त होत होता. किमान गणेशोत्सवापूर्वी तरी अशा ठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचे होते, असे मत व्यक्त होत आहे.









