मालवण / प्रतिनिधी
वंदे भारतसारख्या अत्याधुनिक रेल्वेचे स्वागत आहे. एकेकाळी मनीऑर्डरवर जगणारा कोकणी माणूस आता दिमाखात प्रवास करण्याएवढा आत्मनिर्भर झाला आहे, हे देखील शिवसेना भाजपा युतीचे यश आहे. मात्र आलिशान रेल्वेतून कोकणातील रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर भर पावसात कोकणी माणसांवर सामानासह चिंब भिजत घरी जायची किंवा तसेच भिजत पुढचा प्रवास करायची केविलवाणी अवस्था आज आहे. इथल्या प्लॅटफॉर्मना पुरेशी शेड असणे ही मूलभूत गरज आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी. सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पर्यटन जिल्हा म्हणून शासकीय पातळीवर मान्यताप्राप्त असतानाही त्याची दखल न घेणे दुर्दैवी असल्याची खंत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्रव्यवहार करून व्यक्त केली आहे.
रेल्वेकडे असलेला पर्यटन निधी हा पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गमध्ये खर्च झाला पाहीजे आणि त्यातून जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानके आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजेत अशीही मागणी त्यांनी पत्रात केली आहे. सिंधुदुर्गनगरी सारखे जिल्हा केंद्र असलेले रेल्वेस्टेशन आजही जंगली अवस्थेत असणे हे शोभा देणारे नाही. कोकण रेल्वे हे नाव द्यायचे आणि कोकणच्या जनतेला वाटाण्याच्या अक्षता लावणे हे आतातरी आपल्या कार्यकाळात थांबवावे असे मत या निवेदनपत्रात किसन मांजरेकर यांनी रोखठोकपणे व्यक्त केले आहे.









