शहर परिसरात सर्वत्र लखलखाट : रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी
बेळगाव : लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने संपूर्ण शहर पणत्या, आकाशकंदील व विद्युत रोषणाईच्या प्रकाशाने लखलखून निघाले. बेळगावकरांनी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषामध्ये दिवाळीचे स्वागत केले आणि संध्याकाळी भक्तीभावाने लक्ष्मीपूजनही केले. बहुसंख्य व्यापारीवर्गाने रविवारीच लक्ष्मीपूजन केल्याने पुरोहितवर्गाची मात्र तारांबळ उडाली. महिलावर्गाने घराच्या प्रवेशद्वारासमोर रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटून त्यामध्ये आकर्षक आरास केली. पहाटेच्यावेळी आकाशदिव्यातून पाझरणाऱ्या प्रकाशाने वातावरण मंगलमय व प्रफुल्लित केले. त्याच्या सोबतीने झालेल्या अभ्यंगस्नानानंतर सर्वांनी एकत्र फरळाचा आस्वाद घेतला. दिवाळीची सुरुवात रविवारपासून लक्ष्मीपूजनाने झाली. पहाटेपासूनच बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ सुरू होती. फुले, फळे, ऊस, आंबोत्या यासह इतर पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. रविवारी दुपारनंतर घरोघरी तसेच दुकानांमध्ये लक्ष्मीपूजनासाठीची तयारी सुरू झाली. आपल्या दुकानांसमोर तसेच रस्त्यांवर भव्य रांगोळ्या व्यापाऱ्यांनी साकारल्या होत्या. या रांगोळ्यांमध्ये रंग भरण्यासाठी झेंडूच्या फुलांचा सुरेख वापर करण्यात आला.
दुकानांमध्ये ऊस बांधून त्यानंतर विधिवतपणे झेंडूचे तोरण बांधून पूजन करण्यात आले. लहान व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचीच लक्ष्मीपूजनासाठीची धावपळ सुरू होती. नवीन वर्षाचा शुभारंभ होणार असल्याने खातेकिर्द वह्यांवर श्री लक्ष्मी प्रसन्न, श्री गजानन प्रसन्न असे लिहून ताळेबंदाच्या हिशेबाची सुरुवात केली. चुरमुरे, बत्ताशा यांच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. याबरोबरच पूजेसाठी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना खाद्यपदार्थ देण्याचा ट्रेंडही पहायला मिळाला. अमावस्येमुळे व्यापारीवर्गाला खरेदी होणार की नाही? याबाबत संभ्रम होता. विशेषत: सराफी व्यावसायिकांमध्ये संभ्रम अधिक होता. परंतु, ज्येष्ठ पुरोहितांनी दिवस चांगला असल्याचे सांगितल्याने खरेदीसाठी उत्साह दिसून आला. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तू, वस्त्रप्रावरणे यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मध्यवर्ती बाजारपेठ सोबतच अनगोळ, शहापूर, टिळकवाडी, वडगाव या उपनगरांमध्येही गर्दी झाली होती. उत्साहाचे वातावरण असल्याने कोठेही तक्रारीला वाव मिळाला नाही. मात्र, वाहतूक नियंत्रित करण्यामध्ये पोलिसांची दमछाक झाली.
सोशल मीडियावर संदेशांची देवाणघेवाण
पूर्वी दिवाळीच्या शुभेच्छा घरोघरी जाऊन फराळाचा आस्वाद घेत दिल्या जात होत्या. परंतु, काळ बदलला आणि आता धावपळीच्या जीवनामुळे प्रत्यक्ष घरापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याकडे नागरिकांचा कल आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून शुभेच्छांची देवाणघेवाण सुरू होती. आकर्षक संदेश देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. त्यामुळे प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला दिवाळी स्वागताचे फोटो झळकले.









