विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात स्वामीजींकडून यथोचित पूजा
बेळगाव : अयोध्या येथून आगमन झालेल्या पवित्र आमंत्रण कलशाची विविध मठाधीशांकडून यथोचित पूजा करण्यात आली. येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 8 डिसेंबर रोजी अयोध्या येथून या पवित्र कलशाचे आगमन झाले. भाविकांकडून कलशाचे जंगी स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयामध्ये हा कलश ठेऊन पूजा करण्यात आली. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील स्वामींकडून कलशावर अक्षतारोपण करण्यात आल्या. यानंतर पूज्य स्वामींच्या हस्ते विविध तालुक्यातील संयोजकांकडे मंत्राक्षता सोपविण्यात आल्या.
येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 5 लाख नागरिकांना आमंत्रण दिले जाणार आहे. यासाठी जानेवारी 1 ते 15 पर्यंत अभियान राबविण्यात येणार आहे. पवित्र मंत्राक्षता आणि प्रभू श्रीराम यांचे भावचित्र असणाऱ्या आमंत्रण पत्रिका वितरित करण्यात येणार आहेत. कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामी, गंगाधरेंद्र सरस्वती स्वामी, मुत्नाळचे शिवाचार्य स्वामी, मुक्तानंद स्वामी, अवरोळीचे चन्नबसव स्वामीजी, कलमठाचे मडिवाळ राजयोगेंद्र स्वामी, नागनाथ स्वामी, गंगाधर स्वामी यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम झाला. विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, कार्यदर्शी आनंद करलिंगण्णावर, अभियानाचे विभागीय संयोजक दत्ता नाईक, बजरंग दल संयोजक भावकू लोहार, जिल्हा संयोजक बिटप्पा नायक, गणेश चौगुले आदी उपस्थित होते.









