मिरज / प्रशांत नाईक :
मुंबई-पुण्यानंतर सर्वाधिक प्रदीर्घ काळापर्यंत चालणाऱ्या मिरज शहराच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सकाळपासून प्रारंभहोणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बाप्पांच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध पक्ष, संघटनांकडून स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. यंदा बहुतांशी कमानींवर धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयांसह महाराणा प्रताप आणि येसाजी कंक यांच्या शूर पराक्रमाचे दर्शनही घडविण्यात आले आहे. शिवसेनेच्या दोन्ही कमानी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कमानीवर यंदा सर्वोदयचा महाराजाचे चित्र असून, कमानीवरून मराठी माणूस आणि मराठी महाराष्ट्राचे रक्षण करण्याची साकडे गणरायाला घातले आहे. तर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कमानीवर महाराणा प्रताप यांचा युद्ध संग्राम रेखाटण्यात आला आहे. तसेच राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाबाबत मनसेच्या कमानीवरून संदेश देण्यात आला आहे.
मिरज शहराच्या ऐतिहासिक अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन मिरवणुकीला शनिवारी सकाळपासून सुरुवात होत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात प्रसिध्द असलेला मिरजेचा उत्सव पाहण्यासाठी दोन्ही राज्यातील लाखो भाविकांची मिरज शहरात हजेरी लागणार आहे. गणेश मंडळांसह उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून स्वागत कमानी सज्ज करण्यात आल्या आहेत. या कमानींजवळ स्वागत स्टेजही उभारले आहेत.
यंदा सर्वच स्वागत कमानी लक्षवेधी आहेत. स्वागत कमानी उभारण्याची परंपरा सुरू केलेल्या हिंदूएकता आंदोलनच्या कमानीवर यंदा गोकर्ण महाबळेश्वर येथील लंकासुर रावणाचे गर्वहरण हे तैलचित्र रेखाटण्यात आले आहे. तर मराठा महासंघाच्या कमानीवर शूरवीर येसाजी कंक यांचा पराक्रम दाखवण्यात आला आहे.
प्रमुख कमानींपैकी शिवसेनेच्या दोन्ही कमानींनी यंदाही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर प्रचंड संघर्ष करुन कमान उभारण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेतलेल्या दोन्ही शिवसेनेच्या स्वागत कमानी चर्चेत असतात. एकमेकांसमोरच कमानी असल्याने त्यावरील विषयांची जोरदार उत्सुकता असते. यंदा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कमानीवर सर्वोदयचा महाराजाचे तैलचित्र असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य प्रतिमा उभारली आहे. त्याखालीच हे गणराया महाराष्ट्राचे आणि मराठी माणसासह मराठीचे रक्षण कर, असे साकडे घालण्यात आले आहे. तर ठाकरे सेनेच्या स्वागत कमानीसमोर उभारलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कमानीवर शूरवीर महाराणा प्रताप यांचा युद्धप्रसंग तैलचित्राच्या माध्यमातून रेखाटला आहे. या दोन्ही स्वागत कमानी लक्षवेधी ठरल्या आहेत. याशिवाय मिरवणूक मार्गावर धर्मवीर संभाजी तरुण मंडळ, विश्वशांती संघटना, एकता गणेश मंडळ, शेतकरी संघटना, मनसे, पैलवान विश्वश्री, वनश्री नानासाहेब महाडीक युवा मंच आणि हिंदू-मुस्लिम तरुण मंडळांच्या स्वागत कमानीही सजल्या आहेत.
आज होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीवेळी सर्व मंडळ व भाविकांचे कमानीतून स्वागत केले जाणार आहे. या वेगवेगळ्या कमानीवर विविध सामाजिक व पौराणिक कथांचे तैलचित्र रेखाटले आहे. या सर्व कमानी लक्षवेधी ठरल्या आहेत.








