उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने ‘नाडा’कडून कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रकुल स्पर्धेत दोन वेळा चॅम्पियन ठरलेली महिला वेटलिफ्टर संजिता चानू हिच्यावर भारताच्या उत्तेजकविरोधी एजन्सी नाडाच्या शिस्तपालन समितीने चार वर्षांची बंदी लादली आहे. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत ती दोषी आढळल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.
29 वर्षीय संजिताची चाचणी सकारात्मक आली असून तिच्या नमुन्यात ड्रोस्टानोलोन मेटॅबोलाईट हे निर्बंधित अॅनाबोलिक स्टेरॉईड आढळून आले. जागतिक उत्तेजकविरोधी एजन्सी वाडाने निर्बंधित केलेल्या औषधांची जी यादी जाहीर केली आहे, त्यात या औषधाचा समावेश आहे. गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिचे डोप टेस्टसाठी नमुने घेण्यात आले होते. ‘उत्तेजकविरोधी कलमांचे तिने उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले असून यासाठी तिच्यावर चार वर्षांची बंदी लादण्याचा निर्णय शिस्तपालन समितीने घेतला आहे,’ असे नाडा पॅनेलचे अध्यक्ष चैतन्य महाजन यांनी सांगितले.
संजिताची बंदी 12 नोव्हेंबर 2022 पासून लागू करण्यात आली असून या दिवशी तिचे तात्पुरते निलंबन करण्यात आले होते. तिच्यासाठी हा मोठा धक्का असून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने मिळविलेले रौप्यपदक काढून घेण्यात येणार आहे. या निर्णयानंतर 21 दिवसांच्या आत तिला याविरुद्ध अपील करता येते. यासाठी तिला नाडाच्या अपील्स पॅनेलकडे दाद मागावी लागेल.
संजितावर याआधीही एकदा बंदी घालण्यात आली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपआधी तिची चाचणी घेण्यात आली होती. त्यात ती दोषी आढळल्याने तिच्यावर विश्व वेटलिफ्टिंग फेडरेशनने (आयडब्ल्यूएफ) 2018 मध्ये बंदीची कारवाई केली होती. पण 2020 मध्ये विश्व संघटनेने तिच्यावरील आरोप रद्द करून बंदी मागे घेतली होती. तिच्या नमुन्याची हाताळणी योग्य प्रकारे झाली नसल्याने त्यांनी ही बंदी मागे घेतली होती.









